
कणकवली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरअभियानांतर्गत दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता राधेश्याम बॅक्चेट अॅन्ड लॉन्स, कृष्णनगरी जानवली येथे कणकवली विधानसभा मतदार संघासाठीचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांनी दिली.
या कार्यक्रमास पालकमंत्री नितेश राणे , खा. नारा यण राणे, आ. प्रमोद जठार, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, आ. दिपक केसरकर,आ. निलेश राणे, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग मोहन दहिकर, सर्व पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, नगरसेवक तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन आपल्या दारी या संल्पनेनुसार नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले, मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमामध्ये महसूल, कृषी, ग्रामविकास, वन, मत्स्यव्यवसाय, पंचायत राज, महिला व बालविकास, आरोग्य, समाजकल्याण, सहकार तसेच इतर विविध विभागांच्या योजनांतील पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचे वितरण करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले यामध्ये जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न, वय अधिवास, शेतकरी दाखले, प्रधानमंत्री आवास योजना, महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य व बँक कर्ज, कृषी यांत्रिकीकरण, माती परीक्षण व जमिनीची आरोग्यपत्रिका, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, वन्यप्राण्यांमुळे पिक व पशुहानी नुकसानभरपाई, मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजना, आरोग्य विभागामार्फत देण्यात येणारे आयुष्यमान भारत कार्ड, तसेच इतर विविध शासकीय योजनांचा लाभ यामध्ये समाजकल्याण विभागामार्फत गटई स्टॉल, यासारख्या लाभांचा समावेश आहे.
यावेळी शासनाच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, जिवंत ७/१२, कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क सवलत, निवासी अतिक्रमण नियमितीकरण, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना आदी महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहितीही नागरिकांना देण्यात येणार आहे.याशिवाय महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, वनविभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, पोलीस विभाग, सहकार व पणन विभाग, समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, मुद्रांक व नोंदणी विभाग, भूमी अभिलेख विभाग यांचे स्टॉल उभारणेत येणार असून त्याद्वारे नागरिकांना या विभागामार्फत राबविणेत येणा-या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब तपासणी, करण्यात येणार आहे.याशिवाय शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत रक्तदार शिबीराचेही आयोजन करणेत आलेले आहे. यामध्ये नागरिकही रक्तदान करु शकतात.कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या महसुली व शासकीय सेवांबाबतच्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, कणकवली जगदीश कातकर यांनी केले आहे.










