LIVE UPDATES

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची सावंतवाडीत बैठक

आमदार दीपक केसरकर यांनी स्वीकारले संस्थेचे सभासदत्व
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 29, 2026 19:20 PM
views 17  views

सावंतवाडी : वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील उद्योजक आणि व्यवसायिकांचे जागतिक स्तरावर जाळे तयार करून व्यवसाय वाढीसाठी मदत करण्यासंदर्भात ग्लोबल स्तरावर काम सुरू आहे. सावंतवाडी येथे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची येथील उद्योजक, व्यावसायिकांसह बैठक संपन्न झाली. 

यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सभासदत्व स्वीकारले. व्यवसाय, उद्योगात आपला तरूण कुठेही मागे राहता नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरूण व्यवसायात सक्रीय आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना ग्लोबल स्तरावर पोहचवण्याची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, विश्वस्त विष्णू सातवसे, गिरीश कोळवणकर, राज साडविलकर,आनंद कोळवणकर, ॲड. संतोष भालेकर, डॉ. नितीन पावसकर, शामाकांत खातू, राजन पोकळे, डॉ. अनिष स्वार, वर्धन पोकळे, मेहर पडते, अद्वैत नेवगी, कौस्तुभ नार्वेकर, तनुजा पोकळे, रेणू नेवगी, सोनाली मसुरकर, अदिती पोकळे, प्रसन्न कोदे, आर्या भिसे, आराध्या भिसे, श्री. स्वार, ॲड. समीर वंजारी, कौस्तुभ विर्नोडकर, देवेश पडते, गणेश म्हसकर, ओंकार पोकळे, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.

यावेळी वैश्य समाजात उद्योजक घडले पाहिजेत, यशस्वी, आर्थिक सक्षम समाज म्हणून आपली ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी एकमेकांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून समाज बांधवांसाठी व्यवसाय वृद्धीसाठी विविध उपक्रम, शिबिरे राबवण्यात येत आहेत. ग्लोबल स्तरावर उद्योजक तयार करण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक  डॉ. संतोष कामेरकर यांनी केले.‌ तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाजातील व्यवसायिकांना ग्लोबल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी संस्था मदत करेल, सिंधुदुर्गातही प्रशिक्षण शिबीरांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.