LIVE UPDATES

श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत ‘रानभाजी प्रदर्शन व विक्री’उपक्रम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 18:55 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक साक्षरता आणि स्थानिक जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्याव.) विद्यामंदिर येथे सोमवार, दि. २७ जुलै रोजी ‘रानभाजी प्रदर्शन व विक्री’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  या प्रदर्शनाचे उद्घाटन नीता नीलकंठ दीक्षित महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या . बलवान मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील जाधव उपस्थित होते.

   या उपक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या संकलित करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. तसेच या रानभाज्यांची प्रत्यक्ष विक्री करून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत व्यवहाराचा अनुभव घेतला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, किंमत निश्चिती, नफा-तोटा, नियोजन, ग्राहक सेवा, विपणन कौशल्य, आर्थिक व्यवहार आणि उद्योजकतेची प्राथमिक तत्त्वे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.

     यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे म्हणाले, “शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे. रानभाजी प्रदर्शन व विक्रीसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व, व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळते. स्थानिक निसर्गसंपदेचे जतन करत तिचे आर्थिक मूल्य विद्यार्थ्यांना समजणे ही काळाची गरज आहे.”

     प्राचार्या सौ. बलवान मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “रानभाज्या या आपल्या पारंपरिक आहारसंस्कृतीचा अमूल्य वारसा आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची ओळख करून घेत त्यांचे पौष्टिक महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबी विचारसरणी विकसित होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुभवाधारित शिक्षणाची ही उत्कृष्ट अंमलबजावणी आहे.”

या उपक्रमाला पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्रीला मोठा प्रतिसाद लाभला. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, उद्योजकता, आर्थिक व्यवस्थापन आणि व्यावहारिक ज्ञानाची प्रभावी जडणघडण झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन उपक्रम प्रमुख सतीशकुमार कर्ले  यांनी केले.