LIVE UPDATES

अवैध वृक्षतोडीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा

जिल्हास्तरीय नियंत्रण समिती व सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सच्या बैठकीत निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 20:20 PM
views 40  views

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील वृक्षतोड बंदी क्षेत्रात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीला प्रतिबंध घालणे, वनक्षेत्राचे संरक्षण करणे आणि प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हास्तरीय नियंत्रण समिती व सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सच्या बैठकांमध्ये देण्यात आले.

सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सची मासिक बैठक ३० सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार प्राप्त होणाऱ्या अवैध वृक्षतोडीच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणतीही तक्रार प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात तसेच सावंतवाडी तालुक्यातील १२ गावांमध्ये वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, केंद्र शासनाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील एकूण २५ गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रात करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशांच्या अनुषंगाने अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये महसूल, वन व पोलीस विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीच्या मासिक बैठकांमध्ये प्राप्त तक्रारी तसेच क्षेत्रीय पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या वृक्षतोडीच्या घटनांचा आढावा घेण्यात येतो.

दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही गावात खासगी मालकीच्या किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे अथवा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित गावातील पोलीस पाटील, वनरक्षक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्यामुळे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून चौकशी करणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे शक्य होईल. अशा प्रकरणांच्या चौकशीदरम्यान नागरिकांनी क्षेत्रीय स्तरावरील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीने केले आहे.

अवैध वृक्षतोडीबाबत नागरिकांनी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या sdtfsawantwadi@gmail.com या ई-मेल आयडी तक्रार दाखल करावी तसेच, वनविभाग, सावंतवाडी कार्यालयाच्या ०२३६३-२७२००५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.