
कणकवली : लडाखचे पर्यावरणीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी शिक्षण, पर्यावरण संवर्धन, स्थानिक हक्क आणि विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवित गुरुवारी कणकवलीत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 'आम्ही भारतीय' या संघटनेच्या वतीने शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थितांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त करत त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तसेच पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा सन्मान राखत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी २० जुलै रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संसद मोर्चाला समर्थन जाहीर करत कणकवलीतील नागरिकांनी या आंदोलनाशी एकजूट दर्शविली. देशाच्या विविध भागांतून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मिळत असलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आहे.या लाक्षणिक उपोषणात माजी आमदार वैभव नाईक, नितीन वाळके, विलास कोरगावकर, विलास गुडेकर, बाळू मेस्त्री, नामानंद मोडक, राहुल कदम, राहुल कांबळे, मेगल डिसोजा, फिजा मकानदार यांच्यासह युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपोषणस्थळी उपस्थितांनी घोषणाबाजी करत पर्यावरण संवर्धन, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि जनहिताच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात सुरु असलेल्या या लाक्षणिक उपोषणातून कणकवलीकरांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.










