LIVE UPDATES

नेरूरकरांचा दोन वर्षांचा प्रतीक्षाकाळ संपला

रूपेश पावसकर यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य उपकेंद्र लवकरच होणार सुरू
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 15:17 PM
views 27  views

कुडाळ : नेरूर - देऊळवाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून दोन वर्षे उलटली तरीही हे केंद्र सेवेसाठी खुले झाले नव्हते. मात्र, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला असून, ते लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.उपकेंद्राची इमारत सुसज्ज असूनही ती बंद असल्याने परिसरातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठीही दूरवरच्या आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागत होते. नागरिकांची ही मोठी गैरसोय लक्षात घेऊन पावसकर यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाती घेतला होता.

या विषयावर पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत आवाज उठवला. केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्या या भूमिकेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी नेरूर उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. इमारतीची सद्यस्थिती आणि सुसज्जता पाहून, त्यांनी तातडीने उपकेंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

रस्ते समस्याही मार्गी

केवळ उपकेंद्र सुरू करण्याचे आदेशच नव्हे, तर उपकेंद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता २३ नंबरला नोंद करून घेण्याचे आदेशही ग्रामसेवक व सरपंचांना देण्यात आले आहेत, ज्यामुळे आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्गही सुकर होणार आहे.उपकेंद्र सुरू झाल्यामुळे नेरूरसह परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा आता त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे. स्थानिक नागरिकांनी रूपेश पावसकर यांच्या त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले असून, यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.