
सावंतवाडी : दीपावलीच्या मंगलमय पर्वातील प्रसन्न पहाट सुरांच्या स्वर्गीय मैफलीने अधिकच सुरेल करण्यासाठी सावंतवाडीकरांना एक अनोखी सांगीतिक मेजवानी अनुभवण्याची पर्वणी लाभणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथे सकाळी ७.३० वाजता या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले असून, नाट्यसंगीताचा भावस्पर्शी ठेवा, भक्तिगीतांची भक्तिरसपूर्ण अनुभूती आणि अजरामर मराठी गीतांची स्वरमधुर बरसात अशा बहारदार गीतप्रकारांनी ही पहाट अविस्मरणीय होणार आहे. दीपोत्सवाच्या आनंदाला संगीताची सुरेल किनार लाभावी, मन प्रसन्न व्हावे आणि मराठी संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा रसिकांच्या मनात पुन्हा एकदा जागवला जावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरासह परिसरातील संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल सांगीतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.








