LIVE UPDATES

जलतरण स्पर्धेत टीम सिंधुदुर्गनगरीची पदकांची लयलूट

४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह स्पर्धेत दमदार कामगिरी
Edited by:
Published on: November 08, 2026 07:19 PM
views 62  views

सिंधुदुर्गनगरी:  मेहनत, जिद्द आणि कठोर सरावाच्या जोरावर टीम सिंधुदुर्गनगरीच्या जलतरणपटूंनी सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली. संघाने एकूण ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ९ कांस्य अशी १६ पदके पटकावत सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.दरम्यान यातील स्वरा पालव, उत्कर्ष निवतकर, स्वराज सावंत , समर्थ चव्हाण यांची राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत स्वराज सावंत याने १४ वर्षांखालील गटात १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक, तर ५० आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक मिळविले.

उत्कर्ष निवतकर याने ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य, तर १०० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक पटकावले. स्वरा गावडे हिने मुलींच्या १४ वर्षांखालील गटात २०० मीटर बॅकस्ट्रोक, १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि २०० मीटर फ्रीस्टाइल या तिन्ही प्रकारांत कांस्यपदके मिळविली.

स्वरा पालव हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ५०, १०० आणि २०० मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावत विशेष चमक दाखविली. समर्थ दिनेश चव्हाण याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्य, ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदके मिळविली. अथर्व दिनेश सावंत याने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक, तर भारती दिनेश सावंत हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक पटकावले.

या स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या अथर्व कल्पेश कदम, अथर्व जितेंद्र पेडणेकर, वेदांत विनायक फोपळे ,वेदांत विजय साठे ,आराध्या बाळकृष्ण वाजंत्री यांनी देखील उत्तम कामगिरी बजावली. या सर्व जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून मेहनतीला यशाची जोड दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल टीम सिंधुदुर्गनगरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 'नो पेन, नो गेन' या उक्तीप्रमाणे कठोर मेहनतीतून मिळविलेल्या या यशाने सिंधुदुर्गच्या जलतरण क्षेत्राची मान उंचावली आहे. सर्व यशस्वी जलतरणपटू सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावा मध्ये सराव करत असून त्यांना प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे मार्गदर्शन लाभले तसेंच या जलतरणपटूचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ यांनी अभिनंदन केले आहे.