LIVE UPDATES

अंध बांधवाना टी-शर्ट - साड्या - दिवाळी फराळाचं वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 08, 2026 07:13 PM
views 18  views

सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी येथील नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेतील अंध बंधू-भगिनींना टी-शर्ट, साड्या आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

दृष्टी नसली तरी मनात स्वप्नांची उजळणी करणाऱ्या आणि परिस्थितीशी जिद्दीने दोन हात करणाऱ्या या अंध बंधू-भगिनींच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद अधिक गोड करण्याचा हा संवेदनशील प्रयत्न ठरला. डोळ्यांना दिसणाऱ्या रोषणाईपेक्षा मनाला जाणवणाऱ्या आपुलकीचा प्रकाश अधिक मोलाचा असतो, याची जाणीव या उपक्रमाने करून दिली. भेटवस्तूंच्या रूपाने मिळालेला हा स्नेहाचा ठेवा आणि मायेची ऊब उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. याप्रसंगी सिंधुदुर्ग नॅब संस्थेचे चेअरमन अनंतराव उचगांवकर, सेक्रेटरी आबा कशाळीकर, खजिनदार डॉ. विनया बाड, श्री. शेलटकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे, युवा नेते विशाल परब यांचे प्रतिनिधी केतन आजगांवकर, साईप्रसाद भोई, धिरेंद्र म्हापसेकर, तसेच स्नेहनागरी पतसंस्थेचे शिवकुमार उचगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेतील सुमारे ९० हून अधिक अंध बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.

दरम्यान, विशाल परब यांच्या माध्यमातून अंध बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या आनंदात सहभागी होण्याची ही भावना निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी विशाल परब यांचे आभार मानले.