
वैभववाडी :तालुक्यातील सांगुळवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात बी. फार्मसीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विराट उदयसिंह गायकवाड (वय २२, रा. आळवे कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या विद्यार्थ्याचा रविवारी सायंकाळी आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात तसेच विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विराट गायकवाड हा सांगुळवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात बी. फार्मसीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत जेवण राहत असलेल्या खोलीवर परतला. त्यानंतर अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याचा मित्र केतन किरण माने व इतर मित्रांनी त्याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले .तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.विराट हा महाविद्यालयातील चार ते पाच मित्रांसह बाजारपेठेत भाड्याने राहत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्र परिवारही शोकाकुल झाला आहे.या घटनेची पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.










