
सावंतवाडी : नळपाणी योजनेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी करावी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, प्रकल्प निर्धारित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, याची खात्री करावी असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेत भेट दिली. लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक सुरू असून या बैठकीस माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित आहेत.
अपूर्ण स्थितीत असलेल्या या प्रकल्पाला मुदतवाढ देण्याबाबत नुकतीच सर्वसाधारण चर्चा झाली. यावेळी सभागृहात मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी या कामामुळे सुरू असलेले खोदकाम, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून घडणारे अपघात ही गंभीर बाब असल्याने काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले होते. तसेच जिल्हाधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी करावी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि प्रकल्प निर्धारित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, याची खात्री करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मार्फत प्रभावी देखरेख ठेवून तातडीने आवश्यक जल अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेत. यानंतर आज जिल्हाधिकारी यांनी आज सावंतवाडी नगरपरिषदेस भेट दिली. याबाबत बैठक आयोजित केली असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आदींसह नगरसेवक उपस्थित आहेत. या ठेकेदारावर सावंतवाडीतील अनेकांनी आरोप केले असून क्वालिटी ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली होती. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी देखील या योजनेला प्रभारी नगराध्यक्ष असताना स्थगिती दिली होती. नुकतेच त्यांना पुन्हा एकदा याबाबत पत्र दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो ? याकडे सावंतवाडीच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.










