
सिंधुदुर्गनगरी : माजी खासदार विनायक राऊत तसेच नगरसेवक गीतेश राऊत यांनी सौ. गिरीजा राऊत यांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी दिली.ओरोस येथील वसंत स्मृती येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील आणि सुप्रिया वालावलकर उपस्थित होत्या.
श्वेता कोरगावकर म्हणाल्या, राज्यात महिलांच्या सन्मानासाठी शासन विविध योजना राबवत असताना एका लोकप्रतिनिधीच्या घरातील महिलेला कथितपणे अमानुष वागणूक दिली जाते, तिच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केल्याचा आरोप होतो आणि न्यायासाठी तिला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते, ही बाब अत्यंत गंभीर असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी चिंतेची आहे.
राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असल्याने या प्रकरणात कायद्याची योग्य अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणावे आणि पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री नितेश राणे यांनीही जिल्ह्यात जादूटोणा, अघोरी प्रथा किंवा भोंदूगिरीसारख्या प्रकारांमध्ये कोणी सहभागी असल्यास त्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महिला ही केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. तिच्यावर होणारा प्रत्येक अन्याय हा संपूर्ण समाजावरील अन्याय असून अंधश्रद्धा, भोंदूगिरी, शारीरिक व मानसिक छळ तसेच आर्थिक शोषणाविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहून न्याय, समानता आणि सन्मानाची संस्कृती जोपासली पाहिजे, असेही कोरगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.










