
सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल पाच महिने पूर्ण होत आले असतानाही दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण समितीच्या सभेत सदस्य दीपक गवस यांनी हा गंभीर विषय उपस्थित केला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याने सभागृहात सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
शिक्षण विभागातील समग्र शिक्षण विभागाच्या कारभारावर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शाळा सुरू होऊन पाच महिने होत आले तरी विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध न होणे ही गंभीर बाब असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.
विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी असताना या कामात झालेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. पाठ्यपुस्तकांअभावी विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दाही सभेत मांडण्यात आला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत सभाध्यक्ष प्रितेश राऊळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात दिरंगाई करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, तसेच दोडामार्ग तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










