LIVE UPDATES

आदर्श काणेकरची 'नीट' परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी

कुडाळच्या 'बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 15:31 PM
views 52  views

कुडाळ :  येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचा (सीबीएसई) विद्यार्थी आणि बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडमीत मार्गदर्शन घेतलेला आदर्श नितीन काणेकर याने नुकत्याच पार पडलेल्या नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. आदर्शने एकूण ७२० पैकी ५७५ गुण मिळवत ऑल इंडिया रँकमध्ये (कॅटेगरी) ९८३१ वा क्रमांक आणि ९८.९५ पर्सेंटाइल मिळवत २०,००० च्या आत रँक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

विषयानुसार मिळवलेले विशेष नैपुण्य:

आदर्शने या परीक्षेत विषयानुसार उल्लेखनीय कामगिरी केली आहे:

केमिस्ट्री: ९९.७० पर्सेंटाइल

फिजिक्स: ९७.५६ पर्सेंटाइल

बायोलॉजी: ९६.६० पर्सेंटाइल

मूळचा माणगाव येथील रहिवासी असलेल्या आदर्शने गेल्या तीन वर्षांपासून या परीक्षेसाठी अथक परिश्रम घेतले होते. अकरावी आणि बारावीमध्ये १०० टक्के उपस्थिती नोंदवत, शिक्षकांनी घेतलेल्या ज्यादा तासिकांना  त्याने न चुकता उपस्थिती लावली. त्याच्या या चिकाटीचे आणि अभ्यासू वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदर्शच्या या यशात बायोलॉजीचे मार्गदर्शक शिक्षक विजयसिंह, मधुरा इन्सुलकर, मंदार जोशी, निशांत झा आणि इतर विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांची प्रेरणा आणि संस्थेच्या शैक्षणिक सुविधांचा या यशात मोठा वाटा आहे.या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य चैताली बांदेकर आणि संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर यांनी आदर्शचे, त्याच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे खास अभिनंदन केले आहे. आपल्या मुलाच्या यशाचे श्रेय आदर्शचे आई-वडील, नीता आणि नितीन काणेकर यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि शिक्षकांना दिले आहे.

एमबीबीएस करून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आदर्श काणेकरच्या या यशाने कुडाळ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.