
वेंगुर्ला: तुळस ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी १७ जुलै रोजी शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जयवंत तुळसकर आणि अपक्ष उमेदवार नारायण कुंभार यांच्यात थेट लढत झाली. मतमोजणीनंतर जयवंत तुळसकर यांना ५ मते, तर नारायण कुंभार यांना ६ मते मिळाली. त्यामुळे अपक्ष उमेदवार नारायण कुंभार यांची १ मताच्या फरकाने तुळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली.
तुळस ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता असून भाजपचे सचिन नाईक हे उपसरपंचपदी विराजमान झाले होते. संघटनेत ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर या उपसरपंच पद नियुक्तीसाठी पंचायत अधिकारी श्री चव्हाण यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी भाजप कडून जयवंत तुळसकर तर अपक्ष म्हणून नारायण कुंभार यांनी या उपसरपंच पदासाठी अर्ज भरल्याने याबाबत गुप्त पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. यात ११ सदस्यांपैकी अपक्ष नारायण कुंभार याना ६ तर भाजपच्या जयवंत तुळसकर यांना ५ मते मिळाली. यामुळे या निवडणुकीत अपक्ष नारायण कुंभार विजयी होऊन उपसरपंचपदी विराजमान झाले.
यावेळी सरपंच रश्मी परब, माजी उपसरपंच सचिन नाईक, सदस्य चारित्रा परब, अपर्णा गावडे, विनिता शेटकर, रतन कबरे, स्वाती सावंत, मयुरी बरागडे, रमाकांत ठुंबरे आदी उपस्थित होते. नारायण कुंभार यांची निवड होताच पं स सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, पं स माजी सभापती यशवंत परब, सरपंच रश्मी परब, माजी उपसरपंच सचिन नाईक यांच्यासहित सर्व ग्रा.प. सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.










