
कुडाळ :कुडाळ बस स्थानका शेजारील पार्सल ऑफिसमध्ये राबविण्यात येत असलेल्या 'एन.सी.एम.सी.' (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रावर नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे. सुविधांचा अभाव आणि संथ प्रक्रियेमुळे लांबून येणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी दुर्गम भागातून अनेक नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत. मात्र, पार्सल ऑफिसच्या बाहेर नागरिकांसाठी साधी सावली किंवा शेडची सोय नसल्याने भर उन्हात आणि पावसात उभे राहण्याशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना बसण्याची सुविधा नसल्याने त्यांची प्रकृती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला चक्कर आली किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण?' असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नोंदणी केंद्रावरील कारभार अत्यंत संथ असल्याचे चित्र आहे. ओ.टी.पी. (OTP) येण्यास होणारा विलंब आणि कमी कर्मचारी यामुळे सकाळी आलेल्या प्रवाशांचा नंबर दुपारी १२:३० नंतर लागत आहे. तासनतास ताटकळत उभं राहूनही काम होत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. सत्यवान कुडाळकर या प्रवाशाने सांगितले की, "मी याआधी चार-पाच वेळा येऊन गेलो, पण दिलेला संपर्क क्रमांक लागत नाही. नोंदणीसाठी तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे, हे नागरिकांचे हाल आहेत."
या भोंगळ कारभारावर कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या जागेत नोंदणी सुरू आहे, ती जागा अत्यंत छोटी असून तिथे हवा खेळती राहण्याची कोणतीही सोय नाही. अशा गुदमरणाऱ्या परिस्थितीत कोणाचा जीव गेल्यास प्रशासनाने जबाबदारी घ्यावी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. येत्या १५ दिवसांत जर या नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सुविधा सुरळीत केल्या नाहीत, तर आपण बस आगारावर धडक देण्याचा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.प्रशासनाने नागरिकांची ही परवड त्वरित थांबवून, अधिक खिडक्या सुरू करणे, बसण्याची सोय करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करणे गरजेचे आहे.










