LIVE UPDATES

भाचीच्या स्वागतासाठी मामांनी सजवली कार

'पहिली बेटी धनाची पेटी'चा आनंदोत्सव ; साळगावच्या घोगळे कुटुंबाचा अनोखा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 16:21 PM
views 299  views

कुडाळ : 'पहिली बेटी धनाची पेटी' ही म्हण आजच्या समाजात प्रत्यक्षात उतरतानाचे सुंदर उदाहरण कुडाळ तालुक्यातील साळगाव येथे पाहायला मिळाले. मुलगा-मुलगी असा कोणताही भेदभाव न करता मुलीच्या जन्माचे उत्सवाप्रमाणे स्वागत करणाऱ्या घोगळे कुटुंबाने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

साळगाव येथील अनिरुद्ध घोगळे आणि अमेय घोगळे यांच्या बहिणीला प्रथमच कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या लाडक्या भाचीच्या आगमनाचा आनंद या दोन्ही मामांच्या चेहऱ्यावर अक्षरशः ओसंडून वाहत होता. भाचीचे स्वागत संस्मरणीय व्हावे, यासाठी त्यांनी चक्क कार फुलांनी आणि आकर्षक सजावटीने सजवून नवजात बालिका व तिच्या आईचे जल्लोषात स्वागत केले.

कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात या गोंडस बालिकेचा जन्म झाला. बाळाचे वडील तुषार कासेकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरुंडी गावचे रहिवासी असून प्रसूतीसाठी त्यांची पत्नी माहेरी साळगाव येथे आली होती. कन्यारत्न झाल्याची आनंदवार्ता समजताच आई-वडील, आजी-आजोबा तसेच संपूर्ण घोगळे आणि कासेकर कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बाळाच्या आई-वडिलांनी मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत, "आमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले असून हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे," अशा भावना व्यक्त केल्या. तर मामा अनिरुद्ध घोगळे आणि अमेय घोगळे यांनी, "भाचीच्या स्वागताची आमची मनापासून इच्छा होती. आज ती पूर्ण झाल्याने आम्हाला प्रचंड समाधान वाटत आहे," असे सांगितले.

ढोल-ताशांचा उत्साह नसला तरी प्रेम, आपुलकी आणि आनंदाने भरलेल्या वातावरणात नवजात बालिका व तिच्या आईचे घरी आगमन झाले. मुलीच्या जन्माचे असे उत्साहपूर्ण स्वागत करत घोगळे कुटुंबाने 'मुलगी हीच घराची खरी लक्ष्मी' हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.