
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गकडून जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर HSRP नसलेल्या तब्बल १७२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांकडून १ जुलै २०२६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वाहनांची तपासणी सुरू आहे. तपासणीदरम्यान HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ तसेच संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची कसून पडताळणी केली जात आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, HSRP ही केवळ कायदेशीर अट नसून वाहन सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या प्लेटमुळे वाहनांची अचूक ओळख पटविणे सुलभ होते. तसेच बनावट क्रमांक प्लेटींना आळा बसण्यास, चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यास आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यास मदत होते.
HSRP नसलेल्या वाहनांवर एक हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता आपल्या वाहनांवर अधिकृत माध्यमातून HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुरू असलेली विशेष अंमलबजावणी मोहीम आगामी काळातही सुरू राहणार आहे. HSRP नसलेल्या वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून तातडीने HSRP बसवून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.










