
कणकवली : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात कणकवली शहरातील परबवाडी येथील अभिषेक व्यंकटेश वडार या २० वर्षीय युवकाला कणकवली पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ११ वी इयत्तेत शिकणाऱ्या त्या पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या राहत्या घरी आणून ठेवून संशयित आरोपी अभिषेक वडार याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची शनिवार ११ जुलै रोजी आपल्या आईशी किरकोळ वादावादी झाली होती. त्याच दिवशी दुपारनंतर पीडित मुलगी घरातून निघून गेली. शोधाशोध करूनही मुलगी सापडली नाही म्हणून १४ जुलै रोजी नातेवाईकांनी अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दाखल केली.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांना ती मुलगी कणकवली परबवाडी परिसरात असल्याचे समजले. वृषाली बरगे यांनी सहकारी पोलिसांसह संशयित युवक अभिषेक याच्या परबवाडी येथील घरी गुरुवार १६ जुलै रोजी सकाळी चौकशी केली असता ती मुलगी अभिषेक वडार याच्या घरात आढळून आली. तिला पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्या मुलीने आईशी वादावादी झाल्यानंतर अभिषेक वडार याला कल्पना दिली. त्यानंतर अभिषेक याने पीडित मुलीला आपल्या कणकवली येथील घरी आणले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही १२ जुलै रोजी अभिषेकने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संशयित आरोपी अभिषेक वडार विरोधात पोक्सो सह बीएनएस च्या अन्य कलमानुसार अपहरण आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अटक करण्यात आली आहे. आरोपी अभिषेक याला ओरोस येथे विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार २० जुलै पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे करत आहेत.










