
देवगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) देवगड आगाराने भाविकांसाठी विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित, आरामदायी आणि नियोजनबद्ध प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत भाविकांची तीर्थयात्रा करण्या साठीचा हा उपक्रम आहे.
देवगड आगारामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष तीर्थयात्रेत गणपतीपुळे, मार्लेश्वर, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे भाविकांना एकाच प्रवासात विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी आरामदायी बस, अनुभवी व प्रशिक्षित चालक तसेच सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना एसटीच्या प्रचलित नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा समूह तयार झाल्यास त्या गावातूनच विशेष बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गावागावातील भाविकांना समूहाने तीर्थयात्रा करण्यासाठी स्वतंत्रपणे वाहतूक व्यवस्था करण्याची आवश्यकता भासणार नाही. या विशेष तीर्थक्षेत्र बससेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक भाविकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी देवगड एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी केले आहे.










