
देवगड : देवगडच्या समुद्राशी असलेले मासेमारीचे अतूट नाते आणि युवकांमधील साहसी क्रीडा वृत्तीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तालुक्यातील पहिल्या फिशिंग टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्ट रोजी मिठमुंबरी बीच येथे रंगणार असून, कोकण, कर्नाटक आणि गोवा येथील सुमारे ३० नामांकित स्पर्धक सहभागी होणार आहेत.
देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना ७ ऑगस्ट २०२६ रोजी झाली असून, क्लबच्या पहिल्या स्पोर्टिंग इव्हेंटअंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून दुपारी २ वाजता सांगता व विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील पकडलेल्या माशाच्या वजनानुसार प्रमुख विजेत्यांची निवड केली जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय दीड हजार रुपयांची तीन कन्सोलेशन पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
स्पर्धेदरम्यान सर्वात आधी मासा पकडणाऱ्या स्पर्धकाला ‘मॅक्सिमम कॅच’अंतर्गत विशेष पारितोषिक, तर दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात शेवटी मासा पकडणाऱ्या स्पर्धकालाही कन्सोलेशन प्राईज देण्यात येणार आहे. सर्वाधिक संख्येने मासे पकडणाऱ्या स्पर्धकालाही विशेष पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष ललित चांदोस्कर यांनी दिली.
देवगड स्पोर्ट्स क्लबचा हा उपक्रम केवळ मनोरंजन किंवा स्पर्धेपुरता मर्यादित नसून, युवकांनी अमली पदार्थ, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहून क्रीडा व सामाजिक उपक्रमांकडे वळावे, हा व्यापक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. युवकांना एकत्र आणून देवगडमध्ये सशक्त स्पोर्टिंग कम्युनिटी निर्माण करण्याचा क्लबचा मानस आहे.
दरम्यान, स्पर्धेमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच समुद्रातील जीवसृष्टीला हानी पोहोचणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पकडलेल्या माशांची नोंद घेतल्यानंतर त्यांना तत्काळ पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
तालुक्यात प्रथमच होत असलेल्या या अनोख्या फिशिंग टूर्नामेंटला नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन देवगड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष ललित चांदोस्कर, सोहम पारकर व चिन्मय खानविलकर यांनी केले आहे.










