LIVE UPDATES

सैनिक निलेश घुलघुले देशसेवेनंतर सैन्यातून निवृत्त

बांधकाम मजुरीपासून हवालदार पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास ; सेवानिवृत्तीनंतर आता 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग' परीक्षेचे ध्येय
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 02, 2026 16:12 PM
views 736  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

महाड | सुजित धाडवे

अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती, भौगोलिक आव्हाने आणि आर्थिक अडचणींवर मात करत महाड तालुक्यातील गोठे गावचे सुपुत्र निलेश नारायण घुलघुले यांनी भारतीय सैन्यदलातील २२ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात सन्मानाने निवृत्ती पत्करली आहे. २० ऑगस्ट २००४ रोजी अलिबाग येथील खडतर भरती प्रक्रियेतून सैन्यात रुजू झालेल्या निलेश यांनी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत देशसेवेचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.

सेवाकाळ पूर्ण करून ते नुकतेच आपल्या वसई येथील निवासस्थानी परतले असून, या यशामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या गोठे गावासह संपूर्ण महाड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. निलेश घुलघुले यांचे कुटुंब अत्यंत साधे, वारकरी वृत्तीचे आणि कष्टकरी आहे. आई सुनिता घुलघुले आणि वडील नारायण घुलघुले हे आजही शेतात घाम गाळून कष्टाची भाकर खातात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, या मराठी माता-पित्याने निलेश यांच्यावर प्रामाणिकपणा, श्रम आणि तीव्र देशप्रेमाचे भक्कम संस्कार रुजवले. निलेश यांचे प्राथमिक शिक्षण गोठे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण त्यांनी रावढळ जवळील 'श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल' येथे २००२ मध्ये पूर्ण केले.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी निलेश यांनी सुरुवातीला सेंट्रिंग व आरसीसी बांधकामाचे कौशल्य आत्मसात करून रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात केली. उच्च शिक्षण घेणे शक्य नसतानाही त्यांची उत्तम शारीरिक क्षमता आणि देशभक्तीची जिद्द यांमुळे त्यांनी सैन्यात भरती होण्याचा पक्का निर्धार केला. या प्रवासात त्यांना गावातील स्वातंत्र्यसैनिक संतोष गोलांबडे, स्थानिक ग्रामस्थ तसेच महाड येथील 'नवेनगर' परिसरातील मार्गदर्शन शिबिरांचे मोलाचे सहकार्य लाभले. अखेर २००४ मध्ये अलिबाग येथील भरती प्रक्रियेत स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला.

सैन्यदलात निवड झाल्यानंतर नाशिक येथे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी प्रत्यक्ष सेवेला सुरुवात केली. शिपाई पदावरून सेवा सुरू केलेल्या निलेश यांनी लांस नायक, नायक आणि हवालदार अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. आपल्या २२ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी कारगिल क्षेत्रातील अतिसंवेदनशील, उणे तापमान असलेल्या बर्फाच्छादित सीमांवर, तसेच झाशी, जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा आणि शेवटी पंजाब क्षेत्रात कर्तव्य बजावले. अत्यंत प्रतिकूल हवामानातही 'मराठी बाणा' जपत त्यांनी देशाच्या सीमा अबाधित ठेवल्या. १९९९ च्या कारगिल युद्धात बोफोर्स तोफांच्या माराने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय भूदलाच्या ‘१०८ मिडीयम रेजिमेंट (कारगिल)’ मध्ये त्यांनी तब्बल २२ वर्षे सेवा पूर्ण केली आहे.

२२ वर्षांची निष्कलंक सेवा बजावून परतलेल्या या वीर सुपुत्राचे ग्रामस्थ, नातेवाईक आणि महाडवासीयांकडून अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. निलेश यांच्या या यशोगाथेत त्यांच्या आई-वडिलांच्या त्यागासोबतच पत्नी सुप्रिया घुलघुले, मुलगे श्रेयस व निहार, भावंडे आणि संपूर्ण घुलघुले भावकीचे तसेच गावचे मोलाचे प्रोत्साहन लाभले असल्याचे त्यांनी अवर्जून सांगितले. सध्या त्यांच्यावर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 ‘सेवानिवृत्तीनंतर भावना व्यक्त करताना निलेश घुलघुले म्हणाले की, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची सेवा करण्यासाठी 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग' परीक्षेची पूर्वतयारी मी करत आहे. तसेच, आपल्या भागातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी सैन्यदल आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उतरावे, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचा संकल्पही माझा कायम राहील.’ — निलेश घुलघुले, सेवानिवृत्त सैनिक