LIVE UPDATES

सावंतवाडीतील 'या' इमारतींना नोटिसा

गंभीर तक्रारींची घेतली नगरपरिषदेने दखल
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 21, 2026 19:17 PM
views 28  views

सावंतवाडी : शहरातील शांतता अपार्टमेंट, आनंदवन सोसायटी, साईकृपा अपार्टमेंट या इमारतींमधून निर्माण होणारे सांडपाणी योग्य पद्धतीने व्यवस्थापित न करता रस्त्यावर, नाल्यात, गटारात, मोकळ्या जागेत अथवा सार्वजनिक ठिकाणी सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, डासांची उत्पत्ती तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील संबंधित अपार्टमेंट व इमारतींची पाहणी करून, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटिसीद्वारे संबंधित इमारत, अपार्टमेंट व्यवस्थापनाने आपल्या इमारतीतून निर्माण होणारे सांडपाणी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर, सार्वजनिक नाल्यात, गटारात किंवा मोकळ्या जागेत सोडू नये, तसेच सांडपाण्याची योग्य व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी, तसेच नोटिस प्राप्त झाल्यापासून २४ तासाचे आत बंद करावे तसे न केल्यास ही नोटिस प्राप्त झाल्यापासून २४ तासानंतर नळ कनेक्शन बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित इमारत मालक, व्यवस्थापन समिती अथवा जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील तसेच इमारतीतील सांडपाणी सार्वजनिक ठिकाणी सोडू नये. आपल्या इमारतीतील सांडपाणी व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी असल्यास त्या तात्काळ दूर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व सभापती व नगरसेवक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.