
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी अधिक सक्षम वातावरण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोलर सिस्टिमचे उद्घाटन संपन्न झाले. तुळस जि.प. सदस्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास तुळस श्री देव जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष विष्णू परब, सोलर सिस्टिमच्या पूर्णत्वासाठी मेहनत घेणारे तुळस गावचे उद्योजक सुधीर झांट्ये, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. डिसोझा, स्थानिक प्रतिनिधी प्रकाश परब, संस्थेचे सेक्रेटरी वासुदेव नाईक, संस्थेचे सदस्य मधुकर परब, भगीरथ माळकर, श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालयाचे अध्यक्ष विवेकानंद परब, शाळा समिती सदस्य पराग सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पेडणेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोल्हे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या विशेष प्रयत्नातून तुळस श्री देव जैतिराश्रित संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाला ही सोलर सिस्टिम उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यालयाच्या वीज गरजांसाठी ही सौरऊर्जा व्यवस्था उपयुक्त ठरणार असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने विद्यालयाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यावेळी तुळस श्री देव जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सुजाता पडवळ यांनी विद्यालयासाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असून, सौर ऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आणि विद्यालयाला दीर्घकाळ फायदा होईल, असे मत व्यक्त केले. विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि उपक्रमांना आपल्या परीने सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ, आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला.










