
कणकवली : कोकणातील सर्वात महत्त्वाचा गणेश चतुर्थी सण उंबरठ्यावर आलेला असताना माजी नगरसेवक शिशीर परूळेकर व विद्यमान नगरसेविका आर्या राणे यांच्या योग्य पाठपुराव्यामुळे हायमास्ट कार्यान्वित होत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले.
वर्षभरापूर्वी जिल्हा नियोजन समिती मधून महाराष्ट्र नगरोत्थान (शहर विकास) महाअभियान कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या सौर ऊर्जेच्या हायमास्टचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, नगरसेविका आर्या राणे, औदुंबर राणे, डॉ. संदीप नाटेकर, नगरसेवक राकेश राणे, परेश परब, माजी नगरसेवक अभय रणे, नवनीत बागवे, ओंकार चव्हाण, रेखा गावडे, प्राजक्ता राणे आणि गांगोवाडी येथील नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग किंवा सेवा रस्त्यावरील पथदिवे बऱ्याच वेळा बंद असतात याकडे कोणी लक्ष देत नाही व परिसरातील नागरिक-जनता यांची गैरसोय होत असते. प्रसंगी काळोखात धोकादायक स्थितीत मार्गाक्रमण करणे भाग पडते याचा विचार करून केलेली ही पर्यायी व्यवस्था निश्चितच उजवी आहे. गांगोमंदिर परिसरात हा हायमास्ट ऊभा झाल्याने भाविकानाही त्याचा लाभ होईल.










