LIVE UPDATES

विलंबामुळे वाढणाऱ्या आर्थिक बोजाला जबाबदार कोण?

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 21, 2026 21:26 PM
views 57  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीस झालेल्या विलंबामुळे वाढणाऱ्या प्रचंड आर्थिक बोजाला नेमके जबाबदार कोण? असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे. योग्य आरोग्यसुविधा आणि रुग्णालयाभावी रुग्णांचे प्राण जात असताना, रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असल्याच्या आविर्भावात आनंदोत्सव साजरा करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.  

ते म्हणाले की, शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होऊन त्यात पहिली शस्त्रक्रिया पार पडल्यासारखे वातावरण निर्माण करत आहेत. सन २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार दीपक केसरकर यांनी याच रुग्णालयाचे नाव सांगून मते मिळवली. मात्र, हे रुग्णालय नेमके सावंतवाडी शहरासाठी आहे की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, तसेच ते मुंबई-गोवा महामार्गावर हवे की शहरात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रुग्णालयाचा खर्च ३८ लाखांवरून थेट ८० कोटी रुपयांवर पोहचणार आहे असे केसरकर म्हणत असून या वाढीव खर्चाला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत डॉ. परुळेकर यांनी ८० कोटींमधील टक्केवारीवर लक्ष असल्याचा संशय व्यक्त केला. दरवर्षी सुमारे १० हजार लोक उपचारासाठी गोव्यात जातात असे आमदार दीपक केसरकर म्हणत आहेत. म्हणजेच दररोज १० ते १२ रुग्ण गोव्याकडे रवाना होतात.

उपजिल्हा रुग्णालयात मंजूर १९ पदांपैकी केवळ ३ डॉक्टर कार्यरत आहेत, तर उर्वरित पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर कसे उपलब्ध होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विधिमंडळात कायदा झाल्याशिवाय असे तज्ज्ञ डॉक्टर मिळणे कठीण आहे, त्यामुळे नागरिकांना खोटी माहिती देणे थांबवावे, असे ते म्हणाले.  

भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना जमीन मिळणार का?
जमिनीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, खेमसावंत भोसले, लखमराजे भोसले आणि त्यांच्या वकिलांनी ७० गुंठे जमीन दिल्याचा दावा केला होता. महामार्ग, रेल्वे आणि धरण प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहित केल्या जातात, तर या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना जमीन मिळणार का, असा सवाल त्यांनी केला. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी लोककल्याणासाठी मोफत जमिनी दिल्याचे सांगितले.आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी तज्ज्ञ डॉक्टरबाबत माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख आहे. जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सेवा मिळणे ही चांगली बाब असली, तरी सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांचेच सुसज्ज सक्षमीकरण करून तेथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना मोठा फायदा होईल, असे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले.