LIVE UPDATES

Sindhudurg News : सिंधुदुर्गात ७४, ३५१ घरगुती तर ३२ सार्वजनिक गणपती होणार विराजमान

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज : आरोग्य यंत्रणेसह पोलीस प्रशासन अलर्ट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 17:25 PM
views 44  views

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाला १४ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७४ हजार ३५१ घरगुती (खाजगी) गणपती तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा मार्फत ३२ ठिकाणी गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व बस व रेल्वे स्थानके, महामार्ग आणि सर्व घाट मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये किंवा वाहतुकीची कोंडी कुठेही होऊ नये. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असल्याने जादा रेल्वे, एसटी, खाजगी बस मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात चाकरमानी यायला सुरुवात झाली आहे. यावर्षी ७४ हजार ३५१ खाजगी घरगुती गणपती तर ३२ ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः दीड ते अकरा दिवसापर्यत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. यावर्षी जास्तच उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून घराची रंगरंगोटी व सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. गणेशमूर्ती शाळा मध्ये रंगरंगोटीचा अंतिम हात फिरवला जात आहे. सर्वानाच गणपतीच्या आगमनाची उस्तुकता  लागली आहे.

एकूणच गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असून जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा साथ रोग रोखण्यासाठी सतर्क करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या प्रमुख रेल्वे स्थानक तसेच एस टी स्थानकच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवली आहेत. गणेशोत्सव कालावधित कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यावर्षी एस टी स्थानक व रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

३२ ठिकाणी सार्वजानिक गणपती विराजमान होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- ४,सावंतवाड़ी ७,आचरा १,मालवण २, कणकवली ५,बांदा १,कुडाळ ४, वेंगुर्ला ३, देवगड १, वैभववाडी ४ असे सार्वजानिक गणपतीची स्थापना होणार आहे.

घरोघरी ७४,३५१ गणपती विराजमान होणार

दोडामार्ग ६०३२, बांदा २६९५, सावंतवाड़ी १०१०३,वेंगुर्ला ५४८१, निवती ३३०२,कुडाळ १० १४५ ,सिंधुदुर्गनगरी २४९५,वैभववाडी ५३४५, कणकवली ९७१०,विजयदुर्ग ५५७२,देवगड ६५४०,आचरा २४२५,मालवण ४५०६ , असे एकूण ७४ हजार ३५१ खाजगी गणपती घरोघरी  विराजमान होणार आहेत .

बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी तैनात

गणेशोस्तव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकारी, पोलिस अमलदार व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.