
चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त मुंबई येथून चाकरमान्यांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातील मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या जादा बसला आरवली नजीक खेरशेत कासे फाटा येथे अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण धडकेत एसटीच्या प्रथमदर्शनी भागाचा चाकाचूर झाला आहे. यात एक प्रवासी जखमी झाला असून इतर प्रवाशांना मुकामार लागला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या एसटी बसला मुंबई गोवा महामार्गावरील खेरशेत कासे फाटा येथे भीषण अपघात झाला. एसटी बसचे ब्रेक न लागल्याने बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोर चाललेल्या सोळा टायर ट्रकला पाठीमागून जाऊन धडकली. या भीषण धडकेत एसटीच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. याच दरम्यान मारुती वॅगनआर कारलाही पाठीमागून धडक बसली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या अपघातात एका प्रवाशाला दुखापत झाली तर प्रवाशांना मुका मार लागला आहे. अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त एसटी महामार्गावरच असल्याने या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु असल्याने गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली आहे.










