
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी कित्येक कोकणकर मुंबई वरून आपल्या गावी जात असतात. त्यांचा प्रवास मोफत व सुरक्षित व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी "शिवसेना एक्सप्रेस" विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली. आमदार निलेश राणेंच्या संकल्पनेतून ही गाडी सोडण्यात आली.
१२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दादर येथून कुडाळ, कोकणच्या दिशेने ही एक्स्प्रेस रवाना झाली आहे. या शिवसेना एक्सप्रेसला आमदार निलेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कोकणवासीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, 'दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना त्यांच्या घराकडे पाठविण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत. कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव असून, मुंबई आणि ठाण्यात राहणाऱ्या कोकणवासीयांनी आपल्या गावी जाऊन हा सण साजरा करावा, यासाठी हा उपक्रम सुरू ठेवला आहे.'
'गेल्या काही वर्षांत आतापर्यंत जवळपास ७५ ते ८० हजार कोकणवासीयांना त्यांच्या घराकडे पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. हा कोणताही मोठा पराक्रम नसून, गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांनी आपल्या गावी जावे, ही इच्छा आणि आमचे कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबवित आहोत.'
'महामार्ग क्रमांक ६६ वर माणगावचा टप्पा बॉटलनेक ठरत आहे. या महामार्गावर आता दोनच बॉटलनेक शिल्लक राहिले असून, सध्या वाहतूक कोंडीचा एक प्रमुख टप्पा म्हणून माणगाव दिसत आहे. मात्र पुढील काही दिवसात हा रस्ता सुरळीत झालेला दिसून येईल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










