LIVE UPDATES

OBC reservation : ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाने वैश्यवाणी समाजाला दिलासा

महेश पारकरांकडून शासनाचे आभार : पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्या प्रयत्नांना यश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 18:26 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : वैश्यवाणी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला ओबीसी आरक्षणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासन तसेच वैश्यवाणी समाजाचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दांत भाजप ओबीसी मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश पारकर यांनी शासनाचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

वैश्यवाणी समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर प्रयत्न व पाठपुरावा सुरू होता. या मागणीला आमदार प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे पाठिंबा देत शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय घेतल्याबद्दल पारकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

हा निर्णय वैश्यवाणी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विशेषतः समाजातील तरुणांना शिक्षण, रोजगार आणि विविध शासकीय संधींचे दरवाजे अधिक व्यापकपणे खुले होण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असा विश्वास महेश पारकर यांनी व्यक्त केला.

समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात वैश्यवाणी समाजातील विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी दिलेल्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले. या सर्वांच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा लढा यशस्वी झाला असल्याचे पारकर यांनी सांगितले.

“वैश्यवाणी समाजाला अखेर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांचे आम्ही ऋणी आहोत. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री महोदयांसह शासनाचे जाहीर आभार. हा निर्णय समाजाच्या भावी पिढीला नवी दिशा आणि नव्या संधी देणारा ठरेल,” असे महेश पारकर यांनी म्हटले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल संपूर्ण वैश्यवाणी समाजाचे, तसेच या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.