LIVE UPDATES

Sindhudurg Fodder Management : गवताची पौष्टिकता वाढवून चारा साखळी विकसित करा : पालकमंत्री नितेश राणे

दरवर्षी वापरता येईल अशी शाश्वत चारा व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 07:51 PM
views 108  views
Scientific collection and processing of unused grass to produce nutritious cattle fodder in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आणि सध्या वापरात न येता जाळून टाकल्या जाणाऱ्या गवताचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करून त्यावर प्रक्रिया करावी. त्याची पौष्टिकता (न्यूट्रिशनल व्हॅल्यू) वाढवून जनावरांसाठी उपयुक्त चारा तयार करावा आणि हा अतिरिक्त चारा गरज असलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाठविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त गवताचा योग्य वापर करून राज्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी चारा व्यवस्थापन साखळी विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व्यवस्थापन कृती दलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात चितळे ग्रुपच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी चारा नियोजन माहिती दिली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते. चितळे ग्रुपचे गिरीश चितळे ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला सुका चारा अनेकदा जाळून टाकला जातो. या गवताचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग करून जनावरांसाठी पोषक आहार तयार करता येऊ शकतो. यासाठी चितळे दुग्ध विकास व विस्तार विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गवताचे नमुने घेण्यात आले असून, त्यांचे परीक्षण करून चारा निर्मितीच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री राणे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच वापरात न येणारा आणि जाळून टाकला जाणारा चारा योग्य पद्धतीने कापून त्याचे संकलन व जतन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तयार केलेला चारा इतर दुष्काळी जिल्ह्यातील जनावरांसाठी उपयुक्त ठरेल. जिल्ह्यातील जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा राखून ठेवून उर्वरित चारा चारा टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाठविण्याची व्यवस्था करावी. कोकणातून उर्वरित महाराष्ट्राला चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने पुढाकार घ्यावा.

ही प्रक्रिया केवळ यंदापुरती मर्यादित न ठेवता दरवर्षी राबविता येईल, असे नियोजन करावे. त्यासाठी चारा संकलन, प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतूक यांची सुसूत्र व्यवस्था निर्माण करावी. एकदा विकसित झालेली ही चारा साखळी दरवर्षी उपयोगात आणता येईल. त्यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय टाळण्यासोबतच दुष्काळी भागातील पशुधनासाठी मोठी मदत होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चितळे ग्रुपचे गिरीश चितळे यांनी जिल्ह्यातील गवताच्या नमुन्यांच्या आधारे दोन दिवसांत अहवाल सादर करून उपलब्ध गवताचा चारा म्हणून कितपत उपयोग करता येईल, त्यावर कोणत्या प्रकारची प्रक्रिया आवश्यक आहे आणि त्यापासून किती पोषक आहार तयार करता येईल, याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगितले. या अहवालानंतर उपलब्ध चाऱ्याचे संकलन, प्रक्रिया आणि गरज असलेल्या जवळच्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्याचा पुरवठा करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

चारा निर्मितीसाठी नवनवीन प्रयोग राबवा

जिल्ह्यातील चारा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नवनवीन प्रयोग राबवावेत. उपलब्ध सुका चारा योग्य पद्धतीने संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आवश्यक सहकार्य करेल. तसेच ऊस लागवडीसोबत मक्याच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन पशुधनासाठी नियमित आणि पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या गवताचा उपयोग, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान आणि नियोजनबद्ध चारा उत्पादन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत चारा व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.


ताजी बातमी

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
आकारीपड जमीन प्रश्नावर उद्या गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळावा
November 19, 2026