
सिंधुदुर्गनगरी : संस्था संगणकीकरणाचा महाराष्ट्र राज्याचा रिपोर्ट पाहता टी-1 प्रकारात २१४ पैकी २०९ संस्था म्हणजेच ९८ टक्के कामकाज पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. इतर राज्यांचा विचार करता ९८ टक्के कामकाज देशभरात कोणत्याही राज्यात झाले नसल्याने देशातही पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा बँक उपाध्यक्ष,सर्व संचालक तसेच संस्थांचे चेअरमन, सचिव, जिल्हा बँकेतील अधिकारी/कर्मचारी आणि अभिनंदनास पात्र आहेत असे प्रतिपादन डॉ. ए. व्ही.भवानी शंकर, मुख्य सरव्यवस्थापक राष्ट्रीय बँक पुणे विभाग यांनी ओरोस येथे केले
केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी चर्चा सत्राचे आयोजन ओरोस येथील पत्रकार भवनमध्ये करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय बँक (NABARD) पुणेचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर, कार्यकारी संचालक दिलीप दिघे हे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रीय बँकेचे उपसरव्यवस्थापक अविनाश तिवारी, NABARD च्या जिल्हा प्रबंधक सौ. दिपाली माळी, जिल्हा बँकेचे संचालक सौ. नीता राणे, रविंद्र मडगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँक अधिकारी प्रमोद गावडे, वसंत हडकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक संस्थांचे चेअरमन, सचिव, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक संस्था संगणकीकरणाच्या कामात उल्लेखनीय काम केल्याबद्दल बँक अधिकारी व्ही. डी. हडकर, नाना कुलकर्णी, केशव आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ.भवानी शंकर पुढे म्हणाले संस्था संगणकीकरणाबरोबरच यापुढील काळात संस्थांना CoR बँकिंग प्रणाली लागू होणार आहे. यापुढील काळात संस्थांना अनेक व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पोटनियम दुरुस्ती, संस्था संगणकीकरण आणि देशातील सर्व संस्थांची एकाच प्रकारची संगणक प्रणाली निर्माण केली आहे.
विविध प्रकारचे व्यवसायातील बदल संस्थांना करता येणार आहेत. संस्था महिला पदाधिकाऱ्यांनी विचारलेले प्रश्न पाहता अभ्यासपूर्ण व योग्य प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. याचा विचार करता संस्थांनी संगणकीकरण अंगीकारल्याचे दिसून येते.
विद्याधर अनास्कर यावेळी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कामकाज चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल सर्व संस्थांचे अभिनंदन. जिल्हा बँक सहकारी संस्थांसाठी विविध योजना सवलतीच्या व्याजदराने राबवित आहे. त्याचप्रमाणे संस्था सभासदांसाठी बँकेकडील थेट कर्जाच्या व्याजदरापेक्षा १ टक्का कमी दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. ही बाब सहकाराच्या वाढीसाठी भूषणावह आहे. जिल्हा बँक १ टक्का कमी दराने कर्ज संस्थांना देईल, त्याच दराने महाराष्ट्र राज्य बँकेकडून जिल्हा बँकेला रिफायनान्स करण्यात येईल. संस्थांनी पुढील कालावधीत कर्ज वितरणापुरते मर्यादित न राहता पेट्रोल पंप, शाळा, हॉस्पिटल यासारखे उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारा सर्व कर्जपुरवठा राज्य बँक जिल्हा बँकेला करेल.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यावेळी म्हणाले, २१४ पैकी २०९ संस्था म्हणजेच ९८ टक्के कामकाज पूर्ण करून राज्यात आणि देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
जिल्हा बँकेने मागील पाच वर्षांत प्राथमिक विकास संस्थांसाठी विविध प्रकारे आर्थिक सहाय्य केले आहे. सचिवांच्या पगारासाठी तूट भरपाई, संगणकीकरण कामकाज पूर्ण करणाऱ्या सचिवांना प्रोत्साहनपर रक्कम, सचिवांसाठी मेडिक्लेम पॉलिसी, संस्थांसाठी व्यवस्थापन खर्च, संगणकीकरण कामकाजात सहकार्य अशा विविध प्रकारे संस्थांना आर्थिक सहकार्य जिल्हा बँकेकडून करण्यात आले आहे व यापुढेही करण्यात येईल.
ज्या ज्या वेळी संस्थांकडून कामकाज पूर्ण करण्याची अपेक्षा केली त्या त्या वेळी सर्व संस्थांनी आपले कामकाज पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ठेवण्याचा बहुमान मिळविला आहे. यापुढेही सचिवांनी आपले कामकाजात सातत्य राखत कामकाज करावे.
जिल्हा देखरेख संघामार्फत सचिव यंत्रणा नियुक्तीची कार्यवाही सुरु आहे. पुढील काळात किमान १५० गटसचिव नियुक्त करून संस्थांचे कामकाज अधिक चांगल्याप्रकारे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








