
सावंतवाडी : सिंधू रनर्स आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या वतीने आयोजित ‘सावंतवाडी १२ तास रन २०२६’ हा भव्य रनिंग सोहळा ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मोती तलावाभोवती असलेल्या १.६७ किलोमीटरच्या लूपवर मोठ्या उत्साहात पार पडला. लातूर, कोल्हापूर, गोवा, पुणे, मुंबई तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या १४५ हून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ३ तास, ६ तास आणि १२ तास अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये ३ तास श्रेणीत १०५, ६ तास श्रेणीत २५ आणि १२ तास श्रेणीत १५ धावपटूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान रोट्रॅक्ट आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने हायड्रेशन सपोर्टची जबाबदारी सांभाळली. डॉ. शुक्ल यांच्या टीम व आयुर्वेद महाविद्यालयाने वैद्यकीय साहाय्य, तर अर्पण मेडिकलने प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. फोटोग्राफीची धुरा करण पांचाळ आणि नवज्योत शिरसाट यांनी सांभाळली. सावंतवाडी १२ तास रनचा पारितोषिक वितरण सोहळा सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले, युवराज लखम राजे भोसले, सावंतवाडी नगरपालिका नगरसेवक व पदाधिकारी, तसेच रोटरी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
विजेत्यांची यादी व अंतर
(१ लूप = १.६७ किमी)
१२ तास पुरुष गट
विजेता : हाजी देवणकर – ४९ लूप्स – ८१.८३ किमी
उपविजेता : डॉ. बालाजी म्हाळणकर – ४८ लूप्स – ८०.१६ किमी
१२ तास महिला गट
विजेती : अॅड. सोनल पालाव – ३९ लूप्स – ६५.१३ किमी
उपविजेती : श्रेया अटक – ३७ लूप्स – ६१.७९ किमी
६ तास पुरुष गट
विजेता : देवबा देसाई – ३३ लूप्स – ५५.११ किमी
उपविजेता : अभिजीत पड्याळ – ३१ लूप्स – ५१.७७ किमी
६ तास महिला गट
विजेती : जागृती बांदेलकर – २२ लूप्स – ३६.७४ किमी
उपविजेती : डॉ. अञ्जना काजरेकर – २० लूप्स – ३३.४० किमी
३ तास पुरुष गट
विजेता : संदेश गावस – १९ लूप्स – ३१.७३ किमी
उपविजेता : मेघराज कोकरे – १९ लूप्स – ३१.७३ किमी
३ तास महिला गट
विजेती : श्वेता गावडे – १९ लूप्स – ३१.७३ किमी
उपविजेती : नम्रता कोकरे – १५ लूप्स – २५.०५ किमी
युवा रिले ठरले विशेष आकर्षण
या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरले ते १५ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली युवा रिले स्पर्धा. सिंधू रनर्सच्या मार्गदर्शनाखाली युवा धावपटूंनी उत्कृष्ट सांघिक भावना, जिद्द आणि धावण्याचे कौशल्य दाखवत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रत्येकी ३ मुले आणि १ मुलगी अशा एकूण सहा संघांचा या रिलेमध्ये सहभाग होता. संघांची नावे पारंपरिक ‘गंजरिका’ (Ganjifa) खेळाच्या थीमवर ठेवण्यात आली होती. या युवा धावपटूंनी ११ ते १७ लूप्स पूर्ण करत आपली क्षमता आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची चुणूक दाखवली.
टीम परशुराम – विजेता
५४ लूप्स – ९०.१८ किमी
सुषोभन सावंत, सर्वेश राणे, मानस सावंत आणि स्वरा चव्हाण
टीम नरसिंह – उपविजेता
४९ लूप्स – ८१.८३ किमी
श्रीकृष्ण बांदेकर, स्वराज सावंत, रेहान सारंग आणि काव्या रावळ
टीम वामना – उपविजेता
४९ लूप्स – ८१.८३ किमी
सहज बुरुड, प्रसन्ना आचरेकर, यज्ञेश दळवी आणि अवनी सावंत
या युवा धावपटूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीने स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच, गोवा टीमने या स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा विशेष मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
निसर्गरम्य मोती तलावाच्या परिसरात, उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध जिल्ह्यांतील धावपटूंच्या सहभागाने पार पडलेली ‘सावंतवाडी १२ तास रन २०२६’ ही स्पर्धा सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रातील एक संस्मरणीय पर्व ठरली. या उपक्रमामुळे सावंतवाडीतील रनिंग संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर क्रीडा आणि आरोग्याविषयी सकारात्मक संदेशही पोहोचला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व धावपटू, युवा धावपटू, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक, हायड्रेशन टीम, रोटरी व रोट्रॅक्ट क्लब, सावंतवाडी नगरपरिषद, पदाधिकारी, सहकारी संस्था, प्रायोजक, छायाचित्रकार, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे यावेळी सिंधू रनर्सच्या वतीने आभार मानण्यात आले.










