LIVE UPDATES

दिशादर्शक फलक झाले अदृश्य

पर्यटक व वाहनचालक संभ्रमात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 17:39 PM
views 44  views

सावंतवाडी : सावंतवाडी ते आरोंदा, शिरोडा, सातार्डा या मार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडाझुडपांमध्ये झाकले गेल्याने वाहनचालक व पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक फलकांवर झाडी-झुडपे वाढली असून, कित्येक वर्षे रंगरंगोटी व देखभाल न झाल्याने त्यावरील अक्षरेही गायब व अस्पष्ट झाली आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, शिरोडा, सातार्डा तसेच परिसरातील विविध पर्यटनस्थळांना मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यावरील दिशादर्शक फलक हे मार्गदर्शनाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, हे फलक झाडाझुडपांमध्ये झाकले गेल्याने तसेच ते जीर्ण झाल्याने आवश्यक माहिती वेळेत मिळत नाही. एखादा पर्यटक रात्रीच्या वेळी आल्यास त्यांना नक्की मार्ग कोठे आहे हे समजत नाही.

विशेषतः नवीन वाहनचालक आणि परिसराची माहिती नसलेल्या पर्यटकांना योग्य मार्ग शोधताना संभ्रम निर्माण होत आहे. काही ठिकाणी फलक दिसत नसल्याने चुकीच्या रस्त्यावर जाण्याची शक्यताही निर्माण होत आहे. संबंधित विभागाने या दिशादर्शक फलकांची तातडीने पाहणी करून त्यावरील झाडी-झुडपे हटवावीत. तसेच खराब व अस्पष्ट झालेले फलक दुरुस्त करून त्यांना रंगरंगोटी करावी, अशी मागणी वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे.