
कुडाळ : शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या सायकलचा अन्य विद्यार्थ्यांना उपयोग होण्याच्या दृष्टीने मांडलेली 'सायकल बँक' हि संकल्पना कौतुकास्पद आहे. चार-पाच वर्षांनंतर या सायकलींचा जो काही मेंटेनन्सचा खर्च असेल तो आमच्या सारखी मंडळी करतील. त्यामुळे सायकल बँक हि संकल्पना या शाळेत मूळ धरेल. त्याच बरोबर इतर शाळांना सुद्धा आपण हि संकल्पना अंमलात आणण्यासाठी विनंती करू अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने कमशिप्र मंडळाच्या कुडाळ हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेजच्या १०० गरजू विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते.
कमशिप्र मंडळाचे उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य व्यासपिठावर उपस्थित होते.
सर्व पाहुण्यांना एनसीसीच्या कॅडेट्सनी सलामी दिल्यानंतर सर्व मान्यवर कार्यक्रमाच्या पूर्वार्धासाठी कार्यक्रम स्थळी आले. संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकातून या सायकल वाटप बद्दल माहिती दिली. हायस्कुल मधील शंभर गरजू विद्यार्थ्यांना या सायकलचे वाटप केल्याबद्दल त्यांनी किशोर पाटकर आणि महेश परब यांचे आभार मानले.
दोन वर्षांपूर्वी शाळेने त्यांच्याकडे सायकलचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांनतर संजय पडते आणि अनंत वैद्य यांनी याबाबत पाठपुरावा केला आणि या शंभर सायकल वितरणासाठी उपलब्ध झाल्या. कुडाळ हायस्कुल मधील मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर मुलांनी या सायंकाळी शाळेला परत दिल्या तर इतर मुलांना सुद्धा त्या सायकलचा उपयोग होईल, अशी 'सायकल बँक'ची संकल्पना अनंत वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडली.
हाच धागा पकडून दत्त सामंत यांनी आपल्या मनोगातून या संकल्पनेचे कौतुक करून त्याला दुजोरा दिला. कुडाळ हायस्कुलच्या संस्था चालकांचे हि दूरदृष्टी खरंच कौतुक करण्यासारखी असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
त्याच बरोबर या कार्यक्रमाच्या नीटनेटक्या आयोजनाबद्दल श्री. सामंत यांनी कुडाळ हायस्कुलचे विशेष कौतुक केले. हा कार्यक्रम पाहून कुडाळ हायस्कुल का जिल्ह्यात अव्वल आहे हे समजलं असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी काढले. किशोर पाटकर आणि महेश परब यांचे त्यांनी विशेष आभार मानले. पाटकर आणि परब यांनी आता पर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले असल्याचे श्री. सामंत म्हणाले. तसेच आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी देखील किशोर पाटकर, महेश परब यांचे मनापासून आभार मानले. लोक मुलांना शालेय साहित्य देतात, छत्र्या देतात, रेनकोट देतात पण गरजू मुलांना एवढ्या मोठ्या संख्येने सायकल देण्याचे दातृत्व दाखवल्याबद्दल त्यांनी पाटकर आणि परब यांचे आभार मानले. आपण स्वतःसाठी सायकल घेतली त्यावेळी ती कर्ज काढून घ्यावी लागली होती याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली. यावेळी संजय पडते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
त्यांनतर शाळेच्या पटांगणावर झालेल्या सायकल वाटप कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रातिनिधिक स्वरूपात पाच मुला-मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांचे पालक देखील उपस्थित होते. मुलांनी आणि पालकांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
उपस्थितांचे स्वागत अरविंद शिरसाट, मुख्याध्यपक विपीन वराडे, उप मुख्याध्यापक रंजन तेली यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री. तुळसकर सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित व्हनमाने यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विपीन वराडे यांनी केले. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उप तालुका प्रमुख देवेंद्र नाईक, नगरसेवक अभि गावडे, विलास कुडाळकर, ऍड. राजीव कुडाळकर, दिनेश शिंदे, राजवीर पाटील, प्रसन्न गंगावणे, संस्थेचे का. आ. सामंत, प्रतिभा पाटणकर, दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई, शिक्षक निखिल ओरसकर, इतर शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्यासाठी संजय पडते आणि अनंत वैद्य यांनी विशेष प्रयत्न केले. सायकली मिळाल्यामुळे ग्रामीण भागातून शाळा-कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला याचा निश्चितच हातभार लागणार आहे.












