LIVE UPDATES

धामणसे येथील सोमगंगा नदीवर अर्धगोलातील बंधारे

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 20:00 PM
views 95  views

रत्नागिरी : धामणसेमधील सोमगंगा नदीत आगळावेगळा बंधारा बांधल्याने येथे दररोज शेकडो पर्यटक येऊ लागले आहेत. अर्धगोलातील बंधाऱ्यामुळे येथे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते. त्यांनी फक्त पूल नव्हे तर जलसंधारण व ग्रामीण विकासाचे एक आदर्श मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज हे विकासाचे स्वप्न साकारले आहे.

सोमगंगा नदीतील गाळ काढण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि नाम फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आल्याने जलधारण क्षमता वाढली व नजीकच्या विहिरींनाही पाणी वाढले. या कामासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आमदार किरण सामंत यांनी पुलाची पाहणी केली. येथे पर्यटन वाढीसाठी पुलाजवळ आवश्यक सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनीही येथे भेट दिली. पुलाचे झालेले काम, निसर्गसंपन्न गाव, विकासाला चालना याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. अनिकेत पटवर्धन यांनीही पाठपुरावा केल्याने काम पूर्ण झाले. या वेळी उपसरपंच सौ. ऋतुजा कुळकर्णी, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, मुकुंद जोशी, अविनाश जोशी, विश्वास धनावडे, सिद्धेश चव्हाण, धनराज पवार ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि पाचशे पर्यटक उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगाराच्या संधी

बचतगटाच्या महिलांनी वडापाव, भजी, चहा, मिसळ अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल पुलाजवळ सुरू केले आहेत. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून धामणसे हटवाडी पूल हा कोकणातील ग्रामीण पर्यटन आणि विकासाचा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.

"हटवाडी पूल हा केवळ वाहतुकीसाठी नसून ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या उर्वरित सोयी-सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील."

उमेश कुळकर्णी, भाजप कार्यकर्ता


"सोमगंगा नदी पर्यटनस्थळी पर्यटकांनी कचरा करू नये, गैरकृत्य करू नये आणि असे केल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक पर्यटकाने आपल्या जीवाची व सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पाण्याचा अंदाज घेऊनच आनंद घ्यावा. कोणत्याही अनुचित प्रकारासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ जबाबदार राहणार नाहीत."

अमर रहाटे, सरपंच