LIVE UPDATES

तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्था शतकोत्तर ज्ञानदानाचे कार्य करणारी

सौ. सुप्रिया सनये यांचे प्रतिपादन ; संस्थेच्या १०४ व्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणीची निवड
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 18:42 PM
views 60  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुंबई :  देवगड तालुक्यातील तांबळडेग हे सुशिक्षितांचे गाव अशी ओळख असून एकोप्याने कार्य करणारे कार्यकर्ते आणि शिक्षणोत्कर्षक ज्ञानदानाचे कार्य करणारी संस्था असा लौकिक प्राप्त करण्यात आला आहे. असे कुणकेश्वर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया बाळासाहेब सनये यांनी भांडुप येथील पराग हायस्कूलमध्ये तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या १०४ व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी सौ. सुप्रिया बाळासाहेब सनये यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन होऊन सभेला प्रारंभ करण्यात आला.

 यावेळी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष चंद्रकांत शांताराम कोळंबकर, कायदेशीर सल्लागार अँड राज वसंत कुबल, सल्लागार प्रमोद कांदळगावकर, गणपत सादये, ग्रामसेवा समिती माजी अध्यक्ष तुकाराम दत्तात्रय तथा नाना मोंडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र सनये आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सौ. सुप्रिया बाळासाहेब सनये पुढे म्हणाल्या की, तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेचे जे रोपटे लावण्यात आले तो उदात्त हेतू होता. आज माणूसपण हरवत चालले आहे. आपण सर्वजण धैर्याने प्रेरित होऊन संस्थेच्या कामकाजाला प्राधान्य देत आहात याचा सार्थ अभिमान वाटतो असे नमूद केले. 

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कै. श्री. विलास वसंत कुबल यांचे निधन झाले. त्यांनी २०२१ ते २०२६ या कालावधीत अध्यक्षपद भूषविले. त्यांना मरणोत्तर "कृतज्ञता सन्मान २०२६ पुरस्कार" अध्यक्षा सौ. सुप्रिया बाळासाहेब सनये यांच्या हस्ते श्रीमती विनिता विलास कुबल यांना प्रदान करण्यात आला. कृतज्ञता पुरस्कारांचे लेखन आणि वाचन श्री. गोपाळ कृष्ण नागेश तथा बाबा मुणगेकर यांनी केले. याप्रसंगी कै. विलास कुबल यांच्या विषयी संस्थेचे चिटणीस हरिश्चंद्र आत्माराम कोचरेकर यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रमोद कांदळगावकर, उपचिटणीस सुबोध येरम, ग्रामसेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, प्रभारी अध्यक्ष चंद्रकांत शांताराम कोळंबकर आदींनी सहवेदना व्यक्त केल्या.

 सन २०२६ ते २०३१ करिता नवीन कार्यकारिणी अध्यक्ष सुबोध रामचंद्र येरम, उपाध्यक्ष अनिल तुकाराम राजम, चिटणीस दिगंबर पुंडलिक धावडे, खजिनदार सचिन पांडुरंग जोशी, हिशोब तपासणी संजय शिवराम जोशी, सौ. रिया राज कुबल, सदस्य राजाराम मोतीराम बांदकर, लिलाधर सीताराम कोळंबकर, सौ. शर्वरी दिगंबर धावडे, रामकृष्ण कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. कायदेशीर सल्लागार अँड राज वसंत कुबल, सल्लागार पांडुरंग वासुदेव पराडकर,प्रमोद कांदळगावकर, गणपत सादये, चंद्रकांत कोळंबकर, ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष सिताराम (काका) मुणगेकर, चिटणीस उदयनाथ कोयंडे, सदस्य म्हणून सुनील दत्त भगवान कोचरेकर, संदिप कोळंबकर, सतिश मालडकर यांची निवड करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचालन सुबोध येरम यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.