
कुडाळ: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या ‘चला शाळेत जाऊया’ या विशेष अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पांडुरंगशेठ पडते जि.प. प्राथमिक शाळा, पडतेवाडी येथे भेट देऊन तेथील शैक्षणिक दर्जा व पायाभूत सुविधांची पाहणी केली, तसेच पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील शैक्षणिक धोरणांबाबत महत्त्वाची माहिती दिली. यानंतर ते जिल्ह्यातील इतर नियोजित शाळांनाही भेटी देणार आहेत.
पडतेवाडी शाळेला भेट व इतर शाळांचा दौरा
अभियानाचा भाग म्हणून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सकाळी ८.०० वाजता पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ पडते जि.प. प्राथमिक शाळेपासून आपल्या शाळा भेट सत्राची सुरुवात केली. या भेटीनंतर ते कुडाळ हायस्कूल, बॅ. नाथ पै हायस्कूल (कुडाळ), एस. एल. देसाई विद्यालय (पाट) आणि पावशी येथील जि.प. शाळा क्र. १ या शाळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
कोणतीही शाळा बंद पडू देणार नाही: शिक्षणमंत्री दादा भुसे
कुडाळ पडतेवाडी शाळेच्या भेटीदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना नामदार दादा भुसे म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात 'चला शाळेत जाऊया' उपक्रम अतिशय प्रभावीपणे सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांपासून ते अगदी केंद्रप्रमुखांपर्यंत सर्वांनी शाळांना भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक पातळीवरील उत्कृष्ट उपक्रम संपूर्ण राज्यात राबवता येतील आणि अडचणींवर तात्काळ मार्ग काढता येईल."
अभियानात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करण्यावर भर दिला जात आहे.
राज्यातील एकही शाळा बंद पडणार नाही, याची पूर्ण काळजी राज्य शासन घेईल असे ते म्हणाले. शाळा टिकवणे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे ही केवळ सरकारचीच नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळी भरवण्याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांशी संबंधित जवळपास ९० टक्के प्रश्न मा. मुख्यमंत्र्यांनी सोडवले असून, उर्वरित कायदेशीर बाबींवर सकारात्मक कारवाई सुरू आहे.
शाळा भेटींच्या सत्रानंतर दुपारी १.०० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील 'सिंधुनिती' जिल्हा नियोजन समिती सभागृहात 'चला शाळेत जाऊया अभियाना'ची व्यापक आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती, पायाभूत सुविधा आणि विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला जाईल. यावेळी सी इ ओ अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, श्रीधर पेडणेकर आदी उपस्थित होते.










