LIVE UPDATES

आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहा

शालेय शिक्षणमंत्र्यांचे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 14:59 PM
views 17  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि संस्कार वाढविण्यासाठी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि देशासाठी जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत मंत्री भुसे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा शाळांना भेटी देऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधला. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि विविध उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, विभागीय उपसंचालक प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य, गट विकास अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कुडाळ येथील जिल्हा परिषद पांडुरंग शेठ पडते, पडतेवाडी प्राथमिक शाळेत मंत्री भुसे यांचे विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून स्वागत केले. यावेळी त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मंत्री भुसे यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करून वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध क्षेत्रांत मिळविलेले यश आणि शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम याबाबतही त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध साधनसुविधांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान,कुडाळ हायस्कूलला भेट दिल्यानंतर मंत्री भुसे यांनी वर्गखोल्यांची पाहणी करून शाळेतील शैक्षणिक कामकाजाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ‘राणी लक्ष्मीबाई सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात असून, अशा उपक्रमांना शाळांनी प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद होणार नाहीत, असे स्पष्ट करताना मंत्री भुसे यांनी अशा शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा प्रशासन, शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन, कुडाळ येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलनातून मंत्री भुसे यांना सलामी दिली. विद्यार्थ्यांनी ड्रिलचे सादरीकरण केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री भुसे यांनी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विचारातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करण्यात आलेल्या उपक्रमाचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले. एनसीसीमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. ही शिस्त केवळ एनसीसीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सावधान, विश्राम, परेड यांसारख्या बाबी विद्यार्थ्यांना लहान वयापासून शिकवल्यास त्यातून व्यक्तिमत्त्व विकासास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाबाबत तसेच शाळेतील उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली. उपस्थित पालकांशीही त्यांनी चर्चा केली. संस्थेचे संचालक ज्ञानेश सामंत यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम आणि सुविधांची माहिती दिली. यावेळी मंत्री भुसे यांनी शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असले तरी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. पालकांनी मोबाईलचा वापर कमी करून मुलांशी संवाद वाढवावा. मुलांच्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यांना त्या क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. शाळेसमोर कोणत्याही अडचणी असतील तर त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

माजी विद्यार्थ्यांनीही आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या विकासासाठी आपापल्या परीने योगदान देऊन शाळेचे ऋण फेडावे, असे आवाहन त्यांनी केले. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवून प्रखर राष्ट्रभक्त नागरिक घडविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ‘देश प्रथम’ ही भावना मनात ठेवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे, असेही त्यांनी सांगितले.

पणदूर येथील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाला मंत्री भुसे यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘आभाळ कोकलंय’ या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण केले. वृक्षारोपण, नदी संवर्धन, पाणी बचत, जलसंधारण आणि बंधारे बांधण्याचे महत्त्व या पथनाट्यातून मांडण्यात आले. गावातील पाणीप्रश्न आणि त्यावरील लोकसहभागातून होणारे उपाय यांचे प्रभावी चित्रण विद्यार्थ्यांनी केले. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 

एका विद्यार्थिनीने व्यक्त केलेल्या मनोगताचे मंत्री भुसे यांनी विशेष कौतुक करून तिचा सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट दिल्याबद्दल मंत्री भुसे यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांची ऊर्जा कला, क्रीडा आणि शिक्षणामध्ये दिसली पाहिजे. मंत्री महोदयांच्या भेटीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागात निश्चितच चैतन्य निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी शैक्षणिक गुणवत्तेत जिल्हा सध्या पाचव्या क्रमांकावर असून तो पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन केले.मंत्री भुसे यांनी मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. पथनाट्यातून मांडण्यात आलेल्या दुष्काळ आणि पाणी संवर्धनाच्या संदेशाचे त्यांनी कौतुक केले. ‘

एक पेड माँ के नाम’ अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वृक्षारोपण करावे. हवा, पाणी आणि जमीन यांचा जपून वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीवर शासनाकडून नियोजनबद्ध उपाययोजना सुरू असून जिल्ह्यातही विविध कामे करण्यात येत आहेत, असे त्यांनी नमूद केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजले पाहिजेत. मुलांनी घरात वरिष्ठांचे, जेवणापूर्वी शेतकऱ्यांचे आणि झोपताना देश सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांचे स्मरण करण्याची सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आभार मानले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १, पावशी येथे मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे वाचन ऐकून घेतले. विद्यार्थ्यांकडून गीत सादर करून घेतले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला. शिक्षकांशी चर्चा करून शाळेतील अडीअडचणी आणि आवश्यक सुविधांची माहिती घेतली.