
देवगड : सेवा संकल्प व सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पंचायत समिती देवगड आणि पुरळ गावातील अंगणवाडी सेविकांच्या संयुक्त विद्यमाने पुरळ येथे आनंद मेळावा व बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लोटकर आणि पंचायत समिती सदस्य संजना आळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यास माता, बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्यास पोलीस पाटील देवेंद्र गावकर, मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम, शालिनी तारकर, सक्सेना गावकर, अर्पिता पुरळकर, सुरभी पुरळकर, सई वेतकर, सौ. तोरस्कर आदी अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लोटकर यांच्या पुढाकारातून पाककला तसेच सुदृढ बालक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पौष्टिक आहार प्रात्यक्षिक स्पर्धेत स्नेहा रूपेश दांडेकर यांनी प्रथम, मिनाक्षी सागर शिर्के यांनी द्वितीय, तर साक्षी विजय घाडी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. वैभवी विजय मुळम हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
सुदृढ बालक स्पर्धेत लवेश बंटी मुळम, सिया रूपेश दांडेकर, परिधी मिलिंद मुळम, ओम सागर शिर्के आणि गंधाली श्रीनिवास मराठे यांनी यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी रविंद्र तिर्लोटकर यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडला. तसेच दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा, असे आवाहन केले.
अंगणवाडीच्या ज्येष्ठ सेविकांनी मनोगत व्यक्त करताना तळागाळातील प्रश्नांचा विचार करणारे लोकप्रतिनिधी लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अंगणवाडी सेविका सई वेतकर यांनीही मनोगत व्यक्त करत, सर्वांची साथ मिळाल्यास यापेक्षा अधिक चांगले काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्यात महिलांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत रतांब्याची ७० रोपे उपस्थितांना वाटप करण्यात आली.या उपक्रमामुळे माता व बालकांमध्ये पोषण, आरोग्य, सुदृढ बालविकास आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सुरभी पुरळकर यांनी केले.










