LIVE UPDATES

सिटीस्कॅनचे पैसे घेतल्यास गाठ आमच्याशी

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी रुग्णालय अधीक्षकांना विचारला जाब ; महिन्याभरात सीटीस्कॅन व अन्य सेवांचे 300 रुग्णांकडून पैसे घेतल्याचे उघड
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 15:47 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली :  कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात शासनाकडून खाजगी कंपनी क्रस्ना डायनोस्टिक सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र, सिटीस्कॅन ची सेवा रुग्णांना मोफत न देता रुग्णांकडून गेल्या महिन्याभरात पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे सीटीस्कॅन सेवा शासनाने जर मोफत सुरू केली आहे. मग या सेंटरकडून गेल्या महिन्याभरात सुमारे 300 लोकांकडून पैसे का उकळण्यात आले ? अशी विचारणा ठाकरे शिवसेना विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी रुग्णालय अधिक्षक डॉ. पंकज पाटील यांना जाब विचारत केली . यापुढे  एकाही रुग्णाकडून पैसे घेतले तर शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्यावतीने देण्यात आला. 

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने डॉ. पंकज पाटील यांची भेट घेतली. यावेळी तालुकाप्रमुख राजू राठोड , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके ,नगरसेवक संकेत नाईक, माजी युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, विलास गुडेकर ,अजित काणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या सिटीस्कॅन सेवेत लोकांकडून पैसे उकळण्यात येत होते. याबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी डॉ.पंकज पाटील यांना जाब विचारला. डॉक्टर येथे चांगली सेवा देतात डॉक्टरांच्या कामाबद्दल आम्हाला आक्षेप नाही. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर सेवा देतात हे रुग्णांसाठी फायदेशीर आहे. परंतु क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सिटीस्कॅन ची सेवा मोफत देण्याचे शासनाचे धोरण असताना आता रुग्णांकडून पैसे कसे घेतले जातात?  या डायग्नोस्टिक सेंटरच्या कर्मचाऱ्याला बोलावण्यात आले. त्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास 300 लोकांचे पैसे घेतल्याची बाब समोर आली आहे. जर मोफत सेवा असेल तर हे पैसे कसे घेतले? स्त्रीरोग तज्ञ का येत नाहीत? महिला रुग्णांना सेवा कशी मिळणार ? सोनोग्राफी होत नसल्यामुळे रुग्णांना भूर्दंड पडत आहे. रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाली आहे , त्याला जबाबदार कोण?  असा सवाल सुशांत नाईक यांनी केला. 

त्यावर डॉक्टर पाटील यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे आयपीडी व ओपीडी मधील रुग्णांचे पैसे घेऊ नका असे आदेश आहेत. इतर बाहेरील खाजगी रुग्णालयातून येणाऱ्या रुग्णांना नाम मात्र शुल्क ठेवण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. सर्व रुग्णांना एकसारखीच मोफत सेवा द्या , अन्यथा तुमच्या कार्यालयावर आंदोलन छेडू असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला. याबाबत आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्स यांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती डॉक्टर डॉ. पंकज पाटील यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी आरोग्य सेवेकडे लक्ष द्यावा : सुशांत नाईक

पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी सीटीस्कॅन सेवा जनतेला मोफत सुरू करण्याबाबतचे आश्वासन दिले होते ते खोटे ठरले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित कंपनीला मोफत सेवा देण्याचे पत्र दिले होते.तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी  देखील ही मोफत सेवा द्यावी, अशी मागणी करुन देखील संबंधित कंपनीने गेल्या महिन्याभरात 300 लोकांकडून पैसे उकळण्यात आले  आहेत.  जनतेला पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन खोटे ठरले आहे. 

कणकवली विधानसभा क्षेत्रातील तीनही रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोतज्ञ नाही , सोनोग्राफी केवळ दोनच दिवस होते , रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. जर पालकमंत्री कणकवलीतील रुग्णालय सक्षम करु शकत नाहीत , मग जिल्ह्याचे काय ? असा सवाल सुशांत नाईक यांनी उपस्थित केला. दर‌म्यान,  ज्या पद्धतीने जुगारावर पालकमंत्र्यांनी रेड मारली तशीच रेड कधीतरी उपजिल्हा रुग्णालयावर मारावी ,असा टोला तालुकाप्रमुख राजू राठोड यांनी लगावला.