
कुडाळ: महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प, कुडाळ यांच्यातर्फे नवव्या 'पोषण माह' अभियानानिमित्त लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि योग्य आहाराबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी कुडाळ शहरात भव्य पोषण आहार रॅलीचे आयोजन करण्यात आले.
"आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी" या मुख्य संकल्पनेवर आधारित ही रॅली काढण्यात आली होती. बालकांचे आरोग्य, पोषण व सर्वांगीण विकास ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची, स्वयंसेवी संस्थांची आणि लोकप्रतिनिधींची एकत्रित जबाबदारी आहे, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत आयोजित या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच पर्यवेक्षिका आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक आणि गांधी टोप्या परिधान करून अंगणवाडी सेविकांनी शहरात जनजागृती केली.
कुडाळ तालुक्यातील भावी पिढी सुदृढ व निरोगी व्हावी, तसेच मुलांच्या योग्य पोषण आहाराविषयी मातांमध्ये आणि समाजात जागरूकता निर्माण व्हावी, हा या रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.










