
दोडामार्ग :शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिरंगे पुनर्वसन शाळेत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होत लोकशाही पद्धतीने मतदानाचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची प्रत्यक्ष ओळख झाली.
अटीतटीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या निवडणुकीत विघ्नेश प्रवीण गवस याची शालेय मुख्यमंत्रीपदी, तर यश प्रधान याची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. वेदिका विजयी घाडी हिची सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश काळे, शिक्षक अशोक भोसले व गणेश नवगिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीक्षा गवस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता तसेच लोकशाही मूल्यांची रुजवणूक होण्यास मदत झाली.










