
सावंतवाडी : जिल्हा कारागृह सावंतवाडी वर्ग-2 ची . संस्थानकालीन 143 वर्षे जुनी भिंत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या ऐतिहासिक ठेव्यापैकी एक ठिकाण इतिहासजमा झालं आहे. ही भिंत पाडून त्या जागी नव्यानं मजबूत भिंत उभारण्यात येणार असून ऐतिहासिक लूक देऊ असा दावाही यापूर्वी करण्यात आलाय. त्यासाठी 4 कोटीही मंजूर करण्यात आलेत. मात्र, दगडी भिंतीवर बांधकाम विभागानं केलेल्या चिऱ्यांच्या बांधकामामुळे संरक्षक भिंत धोकादायक बनली होती. वर्षभरापूर्वी त्याचा एक भाग कोसळला होता. याबाबत प्रशासनाकडून संबंधितांवर कोणती कारवाई केली ? याच उत्तर मात्र मिळालेलं नसून सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंतांना संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
या कारागृहाची वास्तू ही ब्रिटीशकालीन आहे. सन 1882 मध्ये या वास्तुचे बांधकाम करण्यात आले होते. त्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या कारागृहाची निर्मिती केली होती. कारागृहाच्या जुन्या संरक्षक भिंतीवरच दोन - अडीच वर्षांपूर्वी चारही बाजूंनी अडीच फुटांचे वाढीव चिऱ्यांचे बांधकाम केले होते. त्यावेळी या बांधकामाला विरोध झाला होता. सिंधुदुर्गनगरीत जिल्हा कारागृहाची नवीन इमारत उभारण्यात आलेली असताना या जुन्या इमारतीवर नाहक खर्च का ? असा सवालही करण्यात आला होता. यातच गतवर्षी दर्शनी भागातील दगडी भिंत कोसळली होती.
यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. तसेच प्रशासनाकडून याची दखल घेत पाहणी करून अहवाल तयार करण्यात आला होता. यानंतर ही भिंत जीर्ण व धोकादायक झाल्याचा अहवाल देत ४ कोटी खर्च करून इथे नवीन संरक्षक भिंत उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे जुनी संरक्षक भिंत पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अस्तित्वात असलेली जीर्ण भिंत पाडून त्या जागी आरसीसी प्रकारची नवीन संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. 328 मीटर लांबी व उंची 8.3 मीटर असणार असून यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगडी भिंतीवर केलेल्या चिऱ्यांच्या बांधकामामुळे ही भिंत कोसळल्याचे शहरवासियांचे म्हणणे होते. त्यानुसार तपासही केला गेला. मात्र, संबंधितावर कोणती कारवाई झाली ? याच उत्तर मिळालेलं नाही. याबाबत कार्यकारी अभियंतांना विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तर उप कार्यकारी अभियंतांनी ही भिंत जीर्ण असल्याने व पाया भक्कम नसल्याने ती पाडून नवी भिंत उभारण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांनी या ठिकाणचे कारागृह जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्यात आल्याने ऐतिहासिक वास्तूत 'जेल टूरिझम' ची संकल्पना मांडली होती. मात्र, आता ऐतिहासिक वारसा जमिनदोस्त झाल्यानं या संकल्पनेच पुढे काय होणार हा प्रश्न असून बांधकाम अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले आहे. सावंतवाडीतील ऐतिहासिक वास्तू इतिहासजमा होत चालल्या असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. इतिहासाचे साक्षीदार जपण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशीही मागणी यानिमित्ताने होत आहे.










