
सावंतवाडी : सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे अत्यंत उत्साहपुर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे व्हा. चेअरमन पिटर दिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेने केवळ संस्थेच्या भक्कम आर्थिक प्रगतीची साक्ष दिली नाही तर सहकारातून समाजसेवेचा जो आदर्श, संस्थापक सहकार रत्न कै. पि. एफ. डॉन्टस यांनी निर्माण केला होता तो अधिक बळकट केल्याचे स्पष्ट केले.
३१ मार्च २०२६ अखेर संस्थेला ३ कोटी ३५ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्थेने २८० कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. कॅथॉलिक पतसंस्थेने केवळ ३२ वर्षांच्या कार्यकाळात सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग "अ" ची परंपरा कायम राखली आहे. चालूवर्षी देखील सभासदांना १४ टक्के लाभांश मंजुर करण्यात आला व लगेचच सभा चालू असताना लाभांश सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात आला. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मिलाग्रीस चर्च सावंतवाडीचे पॅरीश प्रिस्ट फा. मिलेट डिसोजा उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल सभेमध्ये सत्कार करण्यात आला.
तसेच फा. मिलेट डिसोजा यांनी सिंधुदुर्ग डायोसिसचे सावंतवाडी येथील मिलाग्रीस कॅथीइल (चर्च) चे बांधकाम पुर्णत्वास नेल्याबददल व त्यांची दक्षिण डीनरीचे डिन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या श्री मायकल फ्रान्सिस डिसोजा. कोलगाव, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या श्री. मायकल कोजमा डिसोजा. आंबोली, मालवण नगरपालीका नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सौ. अनिता गिरकर. तसेच निसर्गप्रेमी श्री. जोवेल डिसिल्व्हा यांना राज्यस्तरीय पर्यावरणमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच श्री.डाॅमणिक संतान डिसोजा. असिस्टंट.सब इन्स्पेक्टर उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल या सर्वांचे सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
त्यानंतर फा. मिलेट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेने सर्व निकषांचे तंतोतंत पालन करत अत्यंत पारदर्शक कारभार केला असून यामुळेच संस्थेचा पाया अधिक भक्कम झाला आहे त्यामुळे सर्व संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेचे सर्व विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. इतिवृत वाचन संस्थेचे सेक्रेटरी श्री जॉनी फेराव यांनी केले तर अहवाल वाचन सरव्यवस्थापक श्री जेम्स बॉर्जीस यांनी केले. सभेचे सुत्रसंचालन श्री फ्रॅन्की डॉन्टस यांनी केले. सभेला सर्व संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.










