
सावंतवाडी : केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपिडी सावंतवाडीमध्ये चालू होण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी १२ वा. विशेष सभा बोलावून सर्व सदस्यांची सहमती देऊन त्यांच्या अटी मंजूर करून तातडीने ओपीडी चालू करावी असा ठराव मंजूर करून आयुर्वेद संस्थानला पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी नगरसेवक देव्या सुर्याजी यांना दिले. तसेच इतर मुद्द्यांवरही कारवाईचे लेखी आश्वासन त्यांनी दिले. तसेच माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही कार्यवाहीची ग्वाही दिल्यानंतर श्री. सुर्याजी यांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यासाठी यशस्वी शिष्टाई केली.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या सुमारे ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच काम चुकीच्या पद्धतीने झाले असुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली होती. तसेच पाणी पुरवठा विभागातील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांचे निलंबन व प्र. मुख्याधिकारी यांच्या बदलीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. दुपारी मुख्याधिकारी विनायक औंधकर आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. यावेळी उपस्थितांनी प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर केला.
मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच दीपक केसरकर यांनी कार्यवाहीची ग्वाही दिल्यानंतर नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आंदोलन स्थगित केले. नळपाणी योजनेच्या कामाबाबत तृतीय पक्ष तांत्रिक लेखापरीक्षण स्थानिक नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन करण्यात येईल व त्याचा रिपोर्ट येईपर्यंत कंत्राटदार जगताप याचे पुढील काम स्थगित केले जाईल, काम बोगस आढळल्यास कंत्राटदारवर पुढील कारवाई केली जाईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच नगरपरिषद पाणी पुरवठा विभागात झालेल्या लाखोंच्या गैरव्यवहार बाबत पाणी पुरवठा समिती सदस्य व नगरसेवक देव्या सूर्याजी व आंदोलनकर्ते दोन सदस्य यांची कमिटी नेमून विशेष सभा लावून चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर दोषी आढळलेल्या संबंधितांवर तातडीने निलंबनची कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले.
दरम्यान, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या बदलीचा मुद्दाही या आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून चंदगड येथील मुख्याधिकारी येत्या ८ ते १० दिवसांत सावंतवाडी नगरपरिषद मध्ये हजर होतील असे आश्वासन देव्या सूर्याजी यांना दिले. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आणि संजू परब यांनी बदलीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यानंतर देव्या सूर्याजी यांनी आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले व सर्व सभापती नगरसेवक यांनी देव्या सूर्याजी यांची भेट घेत सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन दिले. याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. नीता सावंत कविटकर, ॲड. सायली दुभाषी, सौ शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवेंद्र टेमकर,समीर वंजारी बाबल्या दुभाषी, विनोद सावंत, प्रथमेश प्रभू, अनिकेत पाटणकर, भास्कर आमुणेकर, बबलू मिशाळ, जोसेफ आल्मेडा सर्व पक्षीय पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सावंतवाडी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










