LIVE UPDATES

नमो उद्यानाचे खासदार नारायण राणेंच्या हस्ते लोकार्पण

कुडाळ नगरपंचायतीने दीड वर्षात करून दाखवला कायापालट : आमदार निलेश राणे
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 13:39 PM
views 38  views

कुडाळ : कुडाळ येथील सांगिर्डेवाडी येथे तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून अवघ्या चार महिन्यांत पूर्ण झालेल्या 'नमो उद्याना'चे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून थाटात लोकार्पण करण्यात आले. अत्यंत जलद आणि दर्जेदार काम पूर्ण झाल्यामुळे हे उद्यान विभागीय नमो उद्यान स्पर्धेत अग्रक्रमी धावत आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना आमदार निलेश राणे यांनी प्रशासनासह कुडाळ नगरपंचायतीचे विशेष कौतुक केले. "अवघ्या चार महिन्यांत हे सुंदर उद्यान साकारून प्रशासनाने आणि नगराध्यक्षांनी जनतेला आवडेल असा उत्तम प्रकल्प उभा केला आहे. या नमो उद्यानाला विभागीय स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळावे," अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

आपल्या भाषणात आमदार निलेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. "गेल्या १० वर्षांत कुडाळ विकासाच्या बाबतीत मागे राहिला होता, मात्र नगरपंचायतीने गेल्या दीड वर्षांत काय घडू शकतं हे प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे. राणे साहेबांच्या कार्यकाळानंतर या मतदारसंघात म्हणावं तसं कामच झालं नव्हतं," असा टोला त्यांनी लगावला.

माजी आमदारांवर निशाणा साधताना राणे म्हणाले, "माजी आमदारांना गणेश घाटाच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय लागली आहे. २०२२ मध्ये या कामाला कोणतीच मंजुरी नव्हती. निविदा आणि भूमिपूजन २०२५ मध्ये झाले असताना काम त्यांनी कसे केले? कामाच्या दर्जाबाबत टीका करणाऱ्या 'गॉगल गँग'ला मी सांगू इच्छितो—काम निकृष्ट झाले असेल तर कंत्राटदाराला थेट घरी बसवले जाईल. दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची मला सवय नाही. माजी आमदारांनी ८ तारखेला गणेश घाटाची तक्रार केली, पण त्यांनी स्वतःच्या १० वर्षांच्या कार्यकाळात सभागृहात नक्की काय मागण्या केल्या, हे आधी दाखवावे."

"लवकरच मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे कामही पूर्ण होईल. आम्ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर काम करत आहोत. पत्रकारांनीही या सर्व घडामोडींवर एकांगी भूमिका न घेता दोन्ही बाजू तपासून बातम्या द्याव्यात," असे आवाहन करत त्यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या सोहळ्याला खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर, कुडाळ नगरपंचायत सीईओ खंडू पवळ, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.