
सावंतवाडी : एप्रिल २०२६ मध्ये पार पडलेल्या इयत्ता ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव ब्राह्मणआळी शाळेने १०० टक्के निकाल नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. परीक्षेस बसलेले सर्व ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांपैकी ४ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत झकास स्थान पटकावले आहे. ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पियुष अमित कोचरेकर याने २६० गुण मिळवून जिल्ह्यात ६ वा आणि सावंतवाडी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
शाळेतील श्रीश संतोष सामंत याने २४८ गुण मिळवून जिल्ह्यात २६ वा तर तालुक्यात ६ वा क्रमांक पटकावला. हर्षदा चंद्रकांत राऊळ हिने २३८ गुण मिळवून जिल्ह्यात ४३ वी व तालुक्यात १२ वी जागा मिळवली, तर पार्थ सतिश राऊळ याने २३४ गुण मिळवून जिल्ह्यात ५७ वा आणि तालुक्यात १६ वा क्रमांक प्राप्त केला. याशिवाय गौरांग नारायण राऊळ (२०२ गुण), तुषार संतोष कोचरेकर (१९० गुण), दुर्गेश सावळाराम राऊळ (१८८ गुण) आणि श्री निलेश राऊळ (१६० गुण) हे सर्व विद्यार्थीही उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद दळवी आणि उपशिक्षिका अर्चना तळणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभले.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर,ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ,सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर,आजगाव प्रभाग विस्तार अधिकारी तथा मळगाव केंद्रप्रमुख शिवाजी गावित,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया राऊळ,उपाध्यक्षा रुपाली राऊळ,शिक्षणप्रेमी गोविंद राऊळ,सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि मळगाव ब्राह्मणआळी ग्रामस्थांनी कौतुक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










