
सिंधुदुर्गनगरी : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या दूरध्वनी संपर्कासाठी अधिकृत क्रमांक निश्चित केले आहेत अशी माहिती बँक प्रशासनामार्फत देण्यात आली. यावेळी त्यांनी निश्चित केलेल्या क्रमांकांची माहिती दिली. तसेच ग्राहकांना संशयास्पद कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मार्केटिंग व प्रचारासाठी स्वतंत्र क्रमांक
बँकेच्या योजना, नवीन उत्पादने, ऑफर्स तसेच प्रचारात्मक संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1409345238 हा बँकेचा अधिकृत क्रमांक वापरण्यात येणार आहे. बँकेच्या मार्केटिंग विभागामार्फत या क्रमांकावरूनच ग्राहकांना कॉल करण्यात येतील. त्यामुळे योजनांबाबतची माहिती याच अधिकृत क्रमांकावरून दिली जाईल.
सेवा व कर्जवसुलीसाठी स्वतंत्र क्रमांक
ग्राहक सेवा व कर्जवसुलीसंदर्भातील कॉलसाठी 1600312838 हा बँकेचा अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. कर्जवसुलीच्या प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या थकीत रकमेची माहिती, परतफेडीचे पर्याय तसेच बँकेच्या दैनंदिन कामकाजा संदर्भात उदाहरणार्थ केवायसी, Dormant Reactive इत्यादी बाबतीत ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी या क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. हे कॉल एआय तसेच डायलर मार्फत करण्यात येतात.
बँकेचे आवाहन
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बँकेशी संबंधित संवाद अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांनी बँकेच्या नावाने येणाऱ्या अनधिकृत किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध राहावे आणि बँकेशी संबंधित कॉलची खातरजमा करण्यासाठी वरील अधिकृत क्रमांकांची नोंद ठेवावी, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.










