
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी येथील समता महिला मंडळ'च्या वतीने मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव विद्यालयातील दोन गरीब व होतकरू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी २० हजार रुपयांची मदत देण्यात आली. ही रक्कम कायमस्वरूपी ठेवीच्या स्वरूपात देण्यात आली असून, त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गरजू विद्यार्थिनींना आर्थिक मदत केली जाणार आहे.
समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा आवटे, सचिव मेघना राऊळ आणि खजिनदार सुस्मिता नाईक यांनी प्रत्यक्ष प्रशालेला भेट देऊन ही २० हजार रुपयांची रक्कम मुख्याध्यापक मारुती फाले यांच्याकडे सुपूर्द केली. मंडळाच्या या दातृत्वाबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे विशेष आभार मानले आणि या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या सचिव श्रीम. मेघना राऊळ यांनी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. संबंधित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा मातोंडकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री. सावंत यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










